रत्नागिरी :
जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मौजे आंजर्ले व मंडणगड तालुक्यातील मौजे वेळास या समुद्र किनाऱ्यांना जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, “जैवविविधता ही पर्यावरणीय सुरक्षा व मानवी कल्याणाशी थेट निगडीत आहे. या ठिकाणांना वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यास जैवविविधतेचा होणारा ऱ्हास रोखण्यास मोठी मदत होईल.”
या बैठकीत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर यांच्या संदर्भाने कार्यवाही करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, या किनाऱ्यांवरील ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन व संरक्षण होण्यासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती निर्माण होईल. यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
वारसा स्थळ घोषणेसाठी आवश्यक प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही समितीच्या मंजुरीने तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीदरम्यान विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) यांनी आंजर्ले व वेळास किनाऱ्यांचे महत्त्व दर्शविणारे सादरीकरण केले. हे समुद्र किनारे विशेषतः ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहेत.












