सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या फलनिष्पत्तीबाबत आढावा बैठक
रत्नागिरी :
गेल्या तीन वर्षांपासून रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये आर्थिक विकास व्हावा आणि जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे, यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना राबविण्यात आली आहे. या योजनेच्या मूल्यमापन अभ्यासाकरिता आज जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांच्या संशोधन सहयोग व सल्लासेवा केंद्राचा सहभाग होता.
या बैठकीस यशदा चे संचालक सुमेध गुर्जर, समन्वयक अधिकारी प्रज्ञा दासरवार, संशोधन अधिकारी अजित करपे उपस्थित होते. तसेच सिंधुरत्न कार्यकारी समितीचे विशेष निमंत्रित सदस्य अजित यशवंतराव हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी योजनेशी संबंधित प्रमुख विकास क्षेत्रनिहाय जिल्ह्याचे एकत्रित सादरीकरण केले. शासनाच्या दि. २२ मार्च २०२२ च्या शासन निर्णयानुसार मंजूर अनुदानानुसार कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, वने, महिला व बालविकास अशा विविध विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांची यंत्रणानिहाय सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी त्यांनी सांगितले की, सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत राबविलेल्या योजनांमुळे जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न वाढीस मदत झाली असून स्थानिक रोजगारात वाढ झाली आहे. मंजूर निधीच्या अनुषंगाने उर्वरित निधी प्राप्त झाल्यास योजनेचे उद्दिष्ट अधिक परिणामकारक ठरेल. ही योजना महत्त्वपूर्ण असल्याने ती पुढे सुरू ठेवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
योजनेतून विविध उपक्रम राबविण्यात आले असून त्यात –रोजगार वाढीसाठी टूरिस्ट बस, हाऊस बोट, मच्छीमारांना कुलिंग व्हॅन, बिगर यांत्रिकी नौका बांधणे, ई-स्कूटर वितरण, शेतकऱ्यांना मोफत भात, नागली व भाजीपाला बियाणे वाटप, आंबा बागायतदारांना बोलेरो गाड्या व फळमाशी सापळे अशा योजना समाविष्ट आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथे होणारे प्राणी संग्रहालय हा नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याचेही श्री. सिंह यांनी नमूद केले.
या वेळी श्री. अजित यशवंतराव यांनी योजना लोकोपयोगी असल्याने ती पुढे सुरू राहावी, तसेच तिचा लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी संबंधित विभागांनी अधिक कार्यक्षमतेने काम करावे, अशी सूचना केली. जिल्ह्यात दुग्धव्यवसायाला वाव असून, तो शेतीपूरक व्यवसाय म्हणून योजनेत समाविष्ट करावा, असेही त्यांनी सांगितले. श्री. सुमेध गुर्जर यांनी योजनेच्या मूल्यमापनाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या मूल्यमापनाचा उद्देश केवळ खर्चाचा ताळमेळ घेणे नसून योजनांची सांगड घालणे, पर्यावरणक्षम शाश्वत विकास साधणे आणि योजना सुसुत्रतेने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे हा आहे.
यासाठी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसोबत ४ दिवसांची विभागनिहाय कार्यशाळा घेण्याचेही त्यांनी जाहीर केले. यानंतर संबंधित लाभार्थ्यांबरोबर थेट चर्चा होऊन मार्गदर्शन करण्यात आले. बैठक संपल्यानंतर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानले.












