जिल्हा परिषद सेवेतून निलंबन : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश
सावंतवाडी: मळगाव ग्रामपंचायत प्रभारी ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव सीताराम चव्हाण याला ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर गुन्हा दाखल करून आज ओरोस सिंधुदुर्ग येथील न्यायालयात हजर केले असता मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याशिवाय, चव्हाण याला जिल्हा परिषदेच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
ज्ञानदेव चव्हाण याने मळगाव येथील एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या विकासकाकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली होती. एका गृहनिर्माण प्रकल्पातील घरांचे घरपत्रक उतारे देण्यासाठी चव्हाण यांनी विकासकाकडे ४० हजार रुपयांची मागणी केली होती. याविषयी तक्रार मिळाल्यानंतर एसीबीने सापळा रचून सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये त्याला लाच स्वीकारताना पकडले. मळगाव येथील गृहनिर्माण प्रकल्पाचे विकासक विजय नाईक यांनी घरांच्या घरपत्रक उताऱ्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून चव्हाण हा या कामासाठी टाळाटाळ करत होता. त्यानंतर चव्हाण याने या कामासाठी सुरुवातीला एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र, रक्कम कमी करून अखेर ४० हजार रुपयांवर व्यवहार निश्चित झाला.
विकासकाने याची तक्रार सिंधुदुर्ग एसीबीकडे केल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी विजय पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक दीपक माळी यांच्यासह हवालदार श्री. रेवणकर, अजित खंडे, प्रितम कदम, गोविंद तेली, विजय देसाई, पोलिस शिपाई स्वाती राऊळ, पो. कॉ. भूषण नाईक, योगेश मुंढे या पथकाने यशस्वीरीत्या सापळा रचून चव्हाणला अटक केली.
जिल्हा परिषद सेवेतून तात्काळ निलंबित
ग्रामविकास अधिकाऱ्याने घेतलेल्या लाच प्रकरणाच्या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी तात्काळ आदेश जारी करून ज्ञानदेव चव्हाण याला जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.













