असगणी गावातील बारमाही धबधबा बनणार ‘सेल्फी पॉईंट’

सामाजिक कार्यकर्ते संदीप फडकले यांच्यासह सहकाऱ्यांचा संकल्प

*चिपळूण (संतोष सावर्डेकर):-* खेड तालुक्यातील असगणी गावाला धार्मिक परंपरेबरोबरच पांडवकालीन इतिहास लाभला आहे. या गावात ऐतिहासिक मंदिरे असून निसर्गाने देखील भरभरून वरदान दिले आहे. विशेष म्हणजे बारमाही वाहणारी नदी आणि या नदीचे पाणी असगणी धबधब्याला जाऊन मिळते. यामुळे या बारमाही धबधब्याला ‘सेल्फी पॉईंट’ बनवण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे खेड तालुका माजी अध्यक्ष संदीप फडकले यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सोडला आहे. यामुळे असगणी गावात भविष्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन येथील ग्रामस्थांना मोठी रोजगाराची संधी मिळेल, असा विश्वास फडकले यांनी व्यक्त केला आहे.

 

असगणी गावात पांडवकालीन स्वयंभू महादेव मंदिर असून ते मंदिर पाच पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधले होते. परंतु हे भरपूर वर्षे दुर्लक्षित होते. या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम संदीप फडकले यांनी केले. यासाठी राजेंद्र धाडवे, अजय शिगवण, प्रभाकर फडकले, अरूण फडकले, रुपेश गोसावी, रूपेश बाईत यांचे सहकार्य लाभले.

 

महाराष्ट्रातली असंख्य शिवभक्त महादेवाच्या दर्शनाला येतात. या स्वयंभू महादेव मंदिराच्या अंतर्गत गावचे मंदिर, भैरी देवीचे दुसरं मंदिर आहे. जुना मंदिर भैरी देवाचं, हनुमान मंदिर, श्री दत्त मंदिर, काल-काय, माऊली अशी ही अंतर्गत मंदिरे येतात.

 

*स्वयंभू महादेव मंदिर निसर्गाच्या सानिध्यात!*

 

श्री स्वयंभू महादेव मंदिर परिसर अतिशय सुंदर निसर्गरम्य असे आहे. श्रावण महिन्यात भाविकांची या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असते. मंदिर आणि मंदिराच्या चारही बाजूने वर्षाच्या बारा महिने पाणी असते. मंदिराच्या आजूबाजूला चार मोठे पांडवकालीन तलावही आहेत आणि त्या तलावातून पिंडीच्या खालून पाणी मारुतीरायांच्या मंदिराकडे जाते.

 

*असगणी गावाला पांडवकालीन इतिहास*

 

असगणी गावात पांडव राहिले मंदिराजवळ एक रात्री वास्तव्य केले होते. तिथे दोन घरं होती. त्या घरांचे अस्तित्व पहावयास मिळते. तसेच गावात पांडवकालीन ‘घोडे बाऊ’ म्हणून असून पांडवांनीच विहीर बांधली आहे, असा इतिहास ऐकावयास मिळतो.

 

*असगणी गावातील धबधबा वाहतो बारमाही*

 

असगणी गावची छोटीशी नदी आहे. त्या नदीला बारमाही पाणी असते आणि ते पाणी महादेव मंदिराच्या बाजूने वाहते. ते पाणी असगणी धबधब्याला पडते. असगणी धबधबा महादेव मंदिरापासून दहा मिनिटे अंतरावर आहे. इतर ठिकाणचे धबधबे पावसामध्ये वाहतात. असगणी गावातील धबधबा बारमाही वाहत असतो.

 

*संदीप फडकले व सहकाऱ्यांचा ‘सेल्फी पॉईंट’ बनवण्याचा संकल्प*

 

परंतु, धबधब्याच्या पायथ्याकडे जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग नाही. तो मार्ग व्यवस्थित करण्याबरोबरच धबधब्यावरती ‘सेल्फी पॉइंट’ बनवण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे खेड माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सोडला आहे. असगणी येथील धबधबा ‘सेल्फी पॉईंट’ म्हणून नावारूपास आल्यावर या धबधब्यावर पर्यटक येतील आणि येथे खाद्यपदार्थांचे स्टॉल उभे राहतील. तसेच धबधब्याच्या बाजूला निसर्गरम्य ‘वाघबील’ प्रसिद्ध आहे. संध्याकाळी तिथे ‘सनसेट पॉईंट’ पाहावयास मिळतो. एकंदरीत धार्मिक स्थळे, पांडवकालीन ‘घोडे बाव’ व धबधब्यावरील नियोजित ‘सेल्फी पॉईंट’ मुळे पर्यटनाच्या माध्यमातून गावातील अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास संदीप फडकले यांनी व्यक्त केला आहे.