घरडा कृषी संसाधन केंद्र लवेल येथे रानभाजी प्रदर्शन संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) : घरडा कृषी संसाधन केंद्र लवेल येथे घरडा केमिकल्स लिमिटेड लोटे यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आणि डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत घरडा फोउंडेशन व उद्यानविद्या महाविद्यालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रानभाज्यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते.

रानभाज्यांची ओळख तसेच त्यांचे आहारातील महत्त्व प्रदर्शनांमधून मांडण्यात आले होते. शंभर हुन अधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात सहभाग दर्शविला व माहिती संपादन केली . प्रदर्शनाचे उदघाटन घरडा फाउंडेशन विश्वस्त सतीश वेंगोली आणि घरडा केमिकल्स लोटे साईट हेड रामकृष्ण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. वेंगोली यांनी आपले पूर्वज रानभाज्या खाऊन कसे निरोगी आयुष्य जगत होते याविषयी माहिती दिली. कुलकर्णी यांनी रानभाज्यांवरती काही प्रक्रिया करून त्या पुन्हा मार्केटमध्ये आणता येतील का, जेणेकरून त्यांचा वापर सुयोग्य करता येईल याविषयी माहिती घेण्यास सांगितली. या कार्यक्रमाला घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य प्रमोद पाटील उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तुषार हळदवणेकर, वैभव संनगर व इतर मान्यवर उपस्थित होते. लाखीबाग 3D मॉडेल, पारस बाग 2D मॉडेल, कोकडेमा, जीवामृत, अळंबी असे एक ना अनेक मॉडेल्स ठेवण्यात आले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश उद्यानविद्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, दुर्गम व औषधी संवर्धन आणि नवनवीन अभ्यास शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवणे हा होता. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाची आणि संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले .