५० वर्षे रुग्ण सेवा करणाऱ्या श्रीमती सुनंदा विलणकर यांचा १०० व्या वाढदिनी सत्कार

गौरव पोंक्षे | माखजन 

संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील डॉ दत्तात्रय हरी उर्फ बापू साठे यांच्या प्रसुतिकेंद्रात तब्ब्ल ५० वर्षे रुग्ण सेवा करणाऱ्या श्रीमती सुनंदा काशीराम विलणकर यांचा १०० व्या वाढदिवसानिमित्त गावातील आमनायेश्वर प्रसादिक नाट्य मंडळातर्फे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.एखाद्या ठिकाणी सलग ५० वर्षे निस्वार्थ सेवा करणे,तिही रुग्ण सेवा करणाऱ्या श्रीमती सुनंदा विलणकर यांच्या सारख्या विरळाच.याची दखल व त्यांच्या प्रती आदर व्यक्त करत त्यांना सन्मानित करण्यात आले.

पारतंत्र्याच्या काळात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, १९२९ साली डॉ बापू साठे यांनी बुरंबाड सारख्या ग्रामीण भागात अद्ययावत असे प्रसूतिकेंद्र सुरु केले.बापूंची असलेली हुशारी,उपचार पद्धती व ते स्वतः उत्तम शल्य चिकित्सक असल्याने जिल्हा भऱ्यातून शेकडो रुग्ण येत असत.चालत किंवा बैल गाडयांनी.दमून भागून आलेल्या रुग्णांना व नातेवाई यांची जेवणापासून अन्य बस उठ करणे हा सगळा कारभार श्रीमती सुनंदा विलणकर करत असत.कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करत असल्याने श्रीमती सुनंदा ह्या रुग्णांना व येणाऱ्या नातेवाईकांना आपल्याशा वाटत असत.किंबहुना सगळी सोय चोख पहात असत.आलेल्याला पाणी द्यावे,मुखात वाणी गोड हवी जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्याविषयीं ओढ हवी या उक्ती प्रमाणे श्रीमती सुनंदा ताई सुमारे ५० वर्षे रुग्ण सेवा करत राहिल्या.

डॉ बापू साठे यांचे १९७४ च्या सुमारास निधन झाले..पुढे हे रुग्णालय सुमारे २००० साला पर्यंत सुरु होत.आज त्यांचे घरही नाही आणी रुग्णालय देखील नाही.पण रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून, सेवा करणारे डॉ साठे यांच्या रुग्णालयात काम करणारे अनेक हात आज पंचक्रोशीतच नव्हे तर जिल्हाभर ,चिरंतन स्मरणात राहिले.त्यापैकीच एक म्हणजे श्रीमती सुनंदा काशीराम विलणकर.

सुनंदा ताईंनी वयाच्या २५ व्या वर्षा पासून डॉ साठे यांच्या रुग्णालयात निस्वार्थ पणे पुढची ५० वर्षे सेवा वाहिली.आज १०० व्या वर्षी देखील त्या उपस्थिताना सुदृढ तेचा संदेश देतात.१०० व्या वर्षी देखील कस जगाव हे त्यांच्या कडूनच शिकाव हे खर.

दरम्यान त्यांच्या या अद्वितीय सेवेप्रती आदर व्यक्त करताना,काका लिंगायत,यशवंत साळवी,शशिकांत घाणेकर,शैलेश शिंदे,संतोष कानिम,अजित मोरे,भालचंद्र पड्यार,बंड्या किंजळकर, पांडुरंग मेस्त्री,विश्वास घाग,प्रकाश कवळकर प्रियांक विलणकर,आदिंसह विलणकर कुटुंबिय व ग्रामस्थ उपस्थित होते.