राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

राजापूर (वार्ताहर): महिलांनी आर्थिकदृष्टया स्वावलंबी व्हावे या हेतुने २१ जून २००१ रोजी महिलांनी पुढाकार घेवून सुरू केलेली राजापूर महिला नागरी सह. पतसंस्था आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून पतसंस्थेच्या वाटचालीत सहकार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांचा शनिवारी पतसंस्थेच्या वतीने कृतज्ञता सत्कार करण्यात आला.
पतसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. श्रृती ताम्हनकर होत्या.यावेळी विविध वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींचा व सोशल मिडीयाच्या वृत्त प्रतिनिधींचा महिला पतपेढीच्या वतीने एक फुल झाड व एक पेन देऊन सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक पतसंस्थेच्या संचालिका सौ. स्नेहा कुवेसकर यांनी करून पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचा आढावा घेतला. तर रौप्य महोत्सवी वर्षात राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक व अन्य उपक्रमांची माहिती दिली. पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहारच करत नाही तर समाजपयोगी उपक्रमही राबवित असल्याचे सांगितले. तर पतसंस्थेच्या सचिव सौ. प्रेरणा अमरे यांनी पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. पतसंस्थेची सभासद संख्या  ३१०५ असून मुख्यशाखा राजापूर शहराबरोबरच कोंडये तेर्फ सौंदळ, पाचल, आडीवरे  या ठिकाणी शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामाध्यमातून चांगली सेवा देण्यात येत असून अनेक महिलांनी कर्ज घेवून आपले छोटे मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. पतसंस्थेची आर्थिक स्थिती उत्तम असून कायमच अ वर्ग ऑडीट दर्जा राखलेला आहे.
यावेळी पत्रकार बांधवांच्या वतीने नरेंद्र मोहिते यांनी मनोगत व्यक्त करून पतसंस्थेच्या यशस्वी रौप्य महोत्सवी वाटचालीबद्दल संचालक व कर्मचारी वृंदाचे कौतुक केले. महिलांनी सुरू केलेल्या या पतसंस्थेने एक आदर्श उदाहरण आपल्या कामातून घालून दिल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. ताम्हनकर यांनी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीत अनेक घटकांचे सहकार्य मिळत असते त्यामध्ये पत्रकार बंधुचेही अत्यंत मोलाचे असे सहकार्य लाभल्याचे सांगत पतसंस्थेची चांगली प्रतिमा समाजासमोर नेण्याचे महत्वपुर्ण काम आपण करीत असता त्यामुळे अधिक जोमाने काम करण्याची उर्जा मिळत असल्याचे नमुद केले.
यावेळी नरेंद्र मोहिते, संतोष मोंडे, प्रकाश नाचणेकर, संतोष शिंदे, राजेंद्र बाईत, राजेंद्र जोगले, गोकुळ कांबळे, प्रकाश वळंजु आदी पत्रकार बंधु उपस्थित होते. तर पतसंस्थेच्या  उपाध्यक्षा सौ. श्रध्दा धालवलकर, संचालिका सौ. सुनिता व्हनमाने, सौ. रसिका कुशे, सौ. शितल पटेल, एड. सौ. प्राची मराठे उपस्थित होत्या. सुत्रसंचालन सौ. कुवेसकर यांनी तर आभार संचालिका सौ. शुभांगी सोलगांवकर यांनी मानले.