BREAKING NEWS : उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कार तोडफोड प्रकरणाचा खेड पोलिसांकडून छडा

पाचपैकी तीन आरोपी जेरबंद, गुन्ह्यातील कारही जप्त!
पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची कामगिरी; उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू

खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील प्रसिद्ध उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कारची कळंबणी येथील महानगर गॅस सीएनजी पंपावर तोडफोड केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. ३१ मे २०२६ रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेचा तपास करत पोलिसांनी पाच आरोपींपैकी तीन आरोपींना शोधून काढत अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH 04 MR 6572) पोलिसांनी जप्त केली आहे. खेड पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी येथील महानगर गॅस सीएनजी पंपावर ३१ मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. खेड शहरातील प्रसिद्ध उद्योजक उत्तमकुमार जैन हे आपल्या कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी पंपावर आले होते. यावेळी पिवळ्या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर टुरिस्ट कारमधून आलेल्या पाच जणांनी त्यांच्याशी वाद घालत दादागिरी केल्याचा आरोप आहे. या व्यक्तींनी जैन यांचा मोबाईल फोन आणि कारची चावी हिसकावून घेतली होती. त्यानंतर मोबाईल आणि चावी परत देताना त्यांच्या कारच्या दर्शनी काचेवर जोरदार प्रहार करून कारचे नुकसान करण्यात आले होते.
या घटनेमुळे खेड शहरात खळबळ उडाली होती. रात्रीच्या वेळी सीएनजी पंपावर सुरक्षा रक्षक नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. या प्रकरणाचा तपास खेड पोलिसांकडून सुरू होता.
पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक पी. एस. येवले, दीपक गोरे, व्ही. एस. सातर्डेकर, किरण सकपाळे, सोहेल ढगे आणि विकास पवार यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष मेहनत घेतली. सातत्यपूर्ण तपास आणि प्रयत्नांमधून पोलिसांनी पाचपैकी तीन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यश मिळवले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कारही ताब्यात घेतली आहे.
उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास खेड पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, खेड शहरातील प्रसिद्ध उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कार तोडफोड प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी खेड पोलिसांनी घेतलेली मेहनत महत्त्वपूर्ण ठरली आहे. अनेक महिन्यांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास सातत्याने सुरू ठेवून तीन आरोपींना अटक करणे आणि गुन्ह्यातील वाहन जप्त करणे ही खेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी असून पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्यासह तपास पथकाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.