चिपळूण-खेडमधील कमकुवत ७ पुलांची अल्पावधीत केली पुनर्बांधणी

ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर यांनी पेलले आव्हान!

यशस्वी ‘पूल -उभारक’ ठेकेदार म्हणून मिळवली ओळख

चिपळूण (प्रतिनिधी):- येथील प्रथितयश ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर यांनी अवघ्या ६ महिन्यांत पावसाळ्याअगोदर ७ कमकुवत पुलांची उभारणी करून या गावांमधील वाहतुकीचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात असून ग्रामस्थांनी ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर यांना धन्यवाद दिले आहेत. तर ते अल्पावधीत गाव-वाड्या जोडणारे ‘पूल उभारक’ ठेकेदार म्हणून ओळखले जातात. चिपळूणकर यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

गेल्या काही वर्षांपासून सुरेश चिपळूणकर ठेकेदारी क्षेत्रात कार्यरत आहेत. रस्ते, पूल, साकव यांसारखी ते कामे करतात. २१ जुलै २०२१ रोजीच्या महापुरात चिपळूण मधील रस्ते, साकव, पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे गाव- वाड्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. पावसाळ्या अगोदर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रशासनासमोर आव्हान होते. या कामांचा ठेका येथील प्रतिथयश ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर यांनी घेतला होता. सदरील आव्हान चिपळूणकर यांनी लिलया पेलत अतिवृष्टीतील रस्ते, साकव, पूल पूर्ववत करून वाहतूक सुरळीत करण्यात मोठे योगदान दिले. विशेष म्हणजे निधीबाबत कुरबुर न करता जनतेच्या हिताला प्राधान्य दिले होते. या कामांची बिले उशिराने निघाली. तोपर्यंत जनतेची गैरसोय दूर झाली होती. यामुळे या गावा-गावांतील ग्रामस्थांनी चिपळूणकर यांना धन्यवाद दिले होते.

 

तर यावर्षी पावसाळ्यापूर्वी कमकुवत पुलांची पुनर्बांधणी करून पुढील धोका टाळण्यात यश मिळवले आहे. यामध्ये सावर्डे- हडकणी- नांदगाव मार्गावरील पूल, आंबडस-धामणंद मार्गावरील मोठा पूल, वेरळ – खोपी मार्गावरील गर्डर ( डुबी ) पुलाची पुनर्बांधणी, तिवरे कुंभारवाडी मार्गावरील पूल, कळकवणे -आकले- तिवरे मार्गावरील कमकुवत पुलाची पुनर्बांधणी करणे, अलोरे- पेढांबे- शिरगाव मार्गावरील पूल, गणेशखिंड- सावर्डे- दुर्गेवाडी- तळवडे मार्गावरील कमकुवत पुलाची पुनर्बांधणी करणे, या पुलांच्या कामांचा समावेश होता.

 

नद्यांवरील पुलांची कामे पाहता पावसाळ्यापूर्वी या पुलांची कामे होतील का? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा होता. मात्र, ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर यांनी या पुलांच्या कामांवर लक्ष केंद्रित करून ग्रामस्थ व वाहन चालकांची पावसाळ्यात गैरसोय होणार नाही. यादृष्टीने पुलांची कामे पूर्ण होण्याकडे विशेष लक्ष दिले. यामुळे पावसाळ्या अगोदरच या पुलांची कामे पूर्णत्वास गेली आहेत.

 

वेरळ-खोपी ( डुबी ) नदीवरील महामार्गारील पूल गर्डरच्या सहाय्याने उभारले जातात. तसा पूल वेरळ- खोपी ( डुबी ) नदीवर उभारण्यात आला आहे. यावरून अत्याधुनिक यंत्रणेचा देखील ते अचूकपणे वापर करताना दिसून आले आहेत.

 

चौकट

*सामाजिक क्षेत्रात देखील भरीव योगदान*

नामवंत ठेकेदार म्हणून ओळख असलेले सुरेशशेठ चिपळूणकर यांचे सामाजिक क्षेत्रात देखील फार मोठे योगदान आहे. रोहिदास समाज सेवा संघ चिपळूण या सामाजिक संस्थेचे ते गेले काही वर्ष अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी चिपळूण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक म्हणून पद देखील भूषवले आहे. तसेच चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळीत आहेत. ठेकेदारी क्षेत्रात काम करीत असताना सामाजिक क्षेत्रात देखील ते अग्रेसर राहिले आहेत.

 

चौकट

 

*अधिकाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन- सुरेशशेठ चिपळूणकर*

 

याबाबत ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अमरजित रामसे, उपअभियंता खेड-चिपळूण, शाखा अभियंता यांच्या योग्य त्या मार्गदर्शनामुळे अल्पावधीतच या पुलांची कामे पूर्ण करू शकलो आहोत. पावसाळा नजीक आल्याने डांबराचे थर शिल्लक आहेत. ते पावसाळ्यानंतर पूर्ण करण्यात येतील, अशी प्रतिक्रिया दिली. या पुलांच्या कामासाठी निधी उपलब्ध झालेला नसतांना देखील वाहनचालक व ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, या भावनेतून पावसाळ्यापूर्वी पुलांची कामे पूर्ण केल्याबद्दल येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.