खेड : प्रतिनिधी
रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये रविवार दिनांक 24 ते 25 ऑगस्ट 2025 रोजी गणरायाची स्थापना व पूजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले.
या उत्सवामध्ये संस्थेचे चेअरमन मा. श्री. बिपीनदादा पाटणे, रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी मा. श्री. पराग चिखले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांच्या शुभहस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा व पूजन करण्यात आले.
चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजे साक्षात गणपती. भाद्रपद शुध्द चतुर्थीला या गणरायाचे आगमन संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः कोकणात घरोघरी होते. गणरायाला बुद्धीची देवता असेही म्हटले जाते. त्याची उपासना केल्यामुळे विद्यार्थ्यांला विद्या मिळते. मुलांच्या शारीरिक, बौद्धिक विकासाबरोबरच त्यांची अध्यात्मिक बैठक दृढ व्हावी, यासाठी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल नेहमीच अग्रेसर असते. म्हणूनच रोटरी स्कूलमध्ये गणरायाची स्थापना करून मोठ्या भक्तिभावाने त्याचे पूजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेत ढोल – ताशांच्या गजरात व लेझीमच्या तालावर वाजत-गाजत गणरायाचे आगमन झाले. त्यानंतर गणरायाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गणपतीची आरती, गणपती स्त्रोत्र व मनाचे श्लोक म्हणण्यात आले. विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण केले. शाळेतील संगीत विभागातर्फे श्री गणेशाची आराधना करणारी गीते गाऊन गणरायाला वंदन करण्यात आले. तसेच नृत्यविभागातील विद्यार्थ्यांनी गणपती गाण्यांवर नृत्ये सादर केली. यावेळी ’गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषाने संपूर्ण शाळेतील वातावरण मंगलमय झाले होते. सर्व विद्यार्थ्यांना गणरायाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या श्रद्धेने श्रीगणरायाचे पूजन करून दर्शन घेतले.
संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.










