सार्वजनिक गणेशोत्सोवाचे १२० वे वर्ष
सावंतवाडी । प्रतिनिधी : लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आवाहनाला कोकणातून सर्वप्रथम प्रतिसाद देत स्थापन झालेला, सावंतवाडीतील ‘सालईवाड्याचा राजा’ यंदा १२० व्या वर्षात पदार्पण करत आहे. सोमवारी रात्री ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात या गणपतीचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले. संपूर्ण परिसर गणेशभक्तीच्या उत्साहात दुमदुमून गेला होता.
स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सोवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणून राष्ट्रीय विचारांना चालना दिली. याच विचारांना पाठिंबा देत, सन १९०६ मध्ये कै. विष्णुशेठ सापळे आणि कै. सीतारामशेठ बांदेकर यांनी सावंतवाडीतील सालईवाडा येथे कोकणातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन केले. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा अखंड सुरू आहे.
यंदा गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा हा उत्सव पुढील २१ दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या आगमन सोहळ्याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजा स्वार, उत्सव कमिटी अध्यक्ष प्रतिक बांदेकर, सचिव बाळा नार्वेकर, सहसचिव अभय नेवगी, आबा पडते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










