दोडामार्ग : प्रतिनिधी
पेडणे तालुक्यातील धारगळ येथे आज सकाळी १७ वर्षीय विद्यार्थी ऋषभ शेट्ये याच्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी निलेश गजानन देसाई (रा. कळणे – दोडामार्ग) याला म्हापसा करासवाडा येथून अटक केली आहे. हा हल्ला आज सकाळी ७.५० च्या सुमारास केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ उमेश शेट्ये (१७) हा म्हापशातील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत आहे. आज सकाळी तो सुकेकुळण-धारगळ येथे बसची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींपैकी एकाने त्याच्यावर ॲसिड फेकले. या हल्ल्यात ऋषभ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेने गोवा राज्यात एकच खळबळ उडाली. म्हापसा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे दोडामार्ग तालुक्यातील तरुणाचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच दोन महिन्यापूर्वी घडलेल्या एका गंभीर घटनेचा सूड घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला असावा असा पोलिसांना संशय होता. त्यानुसार पोलीस तपास सुरू होता.
सर्व बाजूंनी केलेल्या चौकशीअंती गोवा पोलिसांनी कळणे (ता. दोडामार्ग) येथील नीलेश गजानन देसाई याला म्हापसा करासवाडा येथून अटक केली. या संपूर्ण घटनेला एका अर्धवट राहिलेल्या प्रेमप्रकरणाच्या सूडाची किनार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.










