सावंतवाडीत ‘श्रीं’च्या आगमनाची जय्यत तयारी

तालुक्यात १८ हजार १४२ घरगुती तर १० सार्वजनिक गणेशोत्सव

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण गौरी-गणपती सणाच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. यावर्षी तालुक्यात एकूण १८,१४२ घरगुती आणि १० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बाप्पांची मूर्ती प्रतिष्ठापना करणार आहेत.

आज, २७ ऑगस्ट रोजी श्री गणेश मूर्तीची स्थापना होणार असल्याने मूर्तीशाळा आणि बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची लगबग वाढली आहे. सावंतवाडी शहरात ७ सार्वजनिक आणि १०,५०० घरगुती गणपती बसणार आहेत, तर बांदा येथे ७,६४२ घरगुती आणि ३ सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत.

गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी घरोघरी जय्यत तयारी झाली असून, घरांची रंगरंगोटी केली आहे. विद्युत रोषणाईने घरे उजळून निघाली आहेत आणि गणेशभक्त बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गणेशभक्त दीड, पाच, सात, नऊ, किंवा अकरा दिवसांसाठी घरगुती गणपतीची स्थापना करणार आहेत. तर सार्वजनिक गणपती अकरा, सतरा, एकोणीस, एकवीस दिवसांसाठी विराजमान होणार आहेत.

‘गणेशोत्सव सण मोठा, महागाईचा नाही तोटा’ अशी स्थिती असली तरी, गणेशभक्त मोठ्या श्रद्धेने श्रींची पूजा करणार आहेत. यावर्षीपासून गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा होत असल्यामुळे प्रत्येक घरात आनंदी आणि उत्साही वातावरण आहे.