गणपती सणात मतदार संघात वीज खंडित पडू नये याची दक्षता घ्या

आमदार किरण सामंत यांनी दिल्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना

लांजा (प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या काळात तालुक्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये, गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडू नये याची काळजी घ्या अशा सूचना आमदार किरण सामंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी लांजा रेस्ट हाऊस येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या.‌

कोकणात सर्वात मोठा सण म्हणजे गणपती उत्सव. यासाठी खास मुंबईकर चाकरमानी गावागावात दाखल होत असतात. त्यामुळे आपसूकच विजेची मागणी देखील वाढत असते. अशा वेळी वीज पुरवठा खंडित झाला तर गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडते. या गोष्टी टाळण्यासाठी महावितरणने सतर्क राहावे. माझ्या मतदार संघातील कोणत्याही घरात वीज पुरवठा खंडित होत कामा नये, याची काळजी घेण्याच्या सूचना आमदार किरण सामंत यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीला महावितरणचे उपअभियंता श्री. चव्हाण, सर्व शाखा अभियंता यांच्या सहित अधिकारी वर्ग, शिवसेना पदाधिकारी आणि ठेकेदार उपस्थित होते.