भक्ती मयेकर खून प्रकरणी संशयिताचे वडील पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणाच्या पोलिस तपासात मुख्य संशयित आरोपी दूर्वास पाटील याच्या वडिलांचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दर्शन पाटील असे त्याचे नाव आहे.

या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले तिघे सध्या पोलिस कोठडीत आहेत. संशयित दूर्वास पाटील याने आधी केलेल्या दोन खून प्रकरणातील एकामध्ये त्याच्या वडिलांचा सहभाग असल्याची प्रथमदर्शनी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्या दृष्टीने पोलिस यंत्रणा तपास करत आहे. पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

भक्तीचा मोबाइल मिळाल्याने त्यावरून करण्यात आलेले कॉल, चॅटिंग अशा स्वरूपाचे काही पुरावे पोलिस तपासात समोर येण्याची शक्यता आहे. या क्रमांकाचा सीडीआर तपासला जाणार आहे. त्यानंतर आणखी काही माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.