रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात २६ ते ३० ऑगस्ट या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषत: २७, २८ आणि २९ ऑगस्ट रोजी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांनी यानुसार शेतीत तातडीची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

हवामानाचा आढावा

गेल्या आठवड्यात (१९ ते २५ ऑगस्ट) जिल्ह्यात एकूण ३७३५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आगामी दिवसांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून तापमानात मोठा फरक पडणार नाही.

भात पिकासाठी सूचना
  • खाचरात साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित काढून टाकावे.

  • बांधांची दुरुस्ती करून पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंतच ठेवावी.

  • तण नियंत्रणासाठी खाचरे स्वच्छ ठेवावीत.

  • किटकनाशक किंवा खतांच्या फवारण्या पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलाव्यात.

नागली, वरी व इतर खरीप पिके
  • नागली पिकाची दुसरी माती द्यायची कामे पुढे ढकलावीत.

  • काही ठिकाणी गोगलगाय प्रादुर्भाव दिसून आला आहे. अशावेळी गोगलगाय हाताने गोळा करून युरियाच्या द्रावणात बुडवून नष्ट कराव्यात.

आंबा व काजू बागा
  • नवीन लागवडीतील झाडांच्या बुंध्याजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

  • झाडांना आधार देण्यासाठी काठ्या बांधाव्यात.

  • पॅक्लोब्युट्रॉझॉलची मात्रा देणे पुढे ढकलावी.

नारळ व सुपारी पिके
  • नारळ व सुपारी बागेत पाण्याचा निचरा करण्याची सोय करावी.

  • खत देणे व फवारणीची कामे मुसळधार पावसामुळे वाया जाण्याची शक्यता असल्याने पुढे ढकलावीत.

हळद व भाजीपाला पिके
  • हळदीच्या शेतात पाणी साचणार नाही याची सोय करावी.

  • भाजीपाला पिके फुलोरा व फळधारणेच्या अवस्थेत असल्याने अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे महत्त्वाचे आहे.

पशुपालकांसाठी सल्ला
  • जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत.

  • शक्यतो झाडाखाली बांधू नयेत, तर गोठ्यातच ठेवावीत.

सामान्य सूचना
  • रासायनिक खते, किटकनाशके व बुरशीनाशकांच्या फवारण्या काही दिवस पुढे ढकलाव्यात.

  • जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी बंधाऱ्यांची बांधणी मजबूत करून पाण्याचा निचरा करतील याची दक्षता घ्यावी.

ही कृषी सल्ला पत्रिका डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्र व हवामान खात्याच्या मार्गदर्शनानुसार तयार करण्यात आली आहे.