रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई: २८ लाखाहून अधिक किमतीचा गुटखा जप्त

रत्नागिरी:

रत्नागिरी पोलिसांनी एका कारवाईत तब्बल २८,४०,१६० रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली असून यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला निर्देश दिले होते. या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक २७ ऑगस्ट २०२५ रोजी देवरुख साखरपा भागात गस्त घालत होते.

साखरपा ते पाली रस्त्यावर ‘याहू ढाबा’समोर एक अशोक लेलँड पिकअप वाहन (क्रमांक एम.एच-10-सीआर-8366) संशयास्पद हालचाल करताना आढळले. पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता, त्यात गोण्या आणि बॉक्समध्ये लपवलेला पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ सापडला.

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांची नावे: विकास गंगाराम पडळकर, वय २८, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली. आणि तेजस विश्वास कांबळे, वय २३, रा. ता. मिरज, जि. सांगली.

आरोपींनी चौकशीत हा गुटखा संगमेश्वर येथे वितरणासाठी नेत असल्याचे कबूल केले. जप्त केलेल्या मालामध्ये २१,४०,१६० रुपये किमतीचा पान मसाला आणि ७,००,००० रुपये किमतीचे पिकअप वाहन आहे, अशी एकूण २८,४०,१६० रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

या दोन आरोपींविरुद्ध देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, २७४, २७५, २२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(d), ३०(२)(α), ३(१), (zz)(iv), आणि ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकामध्ये खालील अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश होता:

* पो.उ.नि. श्री. ओगले.

* पो.हवा/२५१ झोरे.

* पो.हवा/४७७ डोमणे.

* पो.हवा/३०१ पालकर.

* पो.हवा/१०६७ कदम.

* पो.हवा/१२३८ खांबे.

* पो.हवा/१३६२ सवाईराम.

* पो.हवा/१४१० दरेकर.

* पो.हवा/३०६ सावंत.

* चा.पो.कॉ/२१५ कांबळे.