गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या खेड जामगे येथील निवासस्थानी बाप्पांचे आगमन

खेड (राकेश कोळी) │ गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात शिवसेना नेते रामदास कदम आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या खेड जामगे येथील निवासस्थानी यंदाही गणपती बाप्पांचे आगमन झाले. कदम कुटुंबीयांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आणि भक्तिगीतांच्या निनादात मोठ्या जल्लोषात बाप्पांचे स्वागत केले.

या प्रसंगी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली. मंत्रोच्चारांच्या गजरात करण्यात आलेल्या या पूजेत कदम कुटुंबीय, स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाविकांनीही या वेळी गणरायाचे दर्शन घेऊन गणपती बाप्पा मोरया! असा जयघोष केला.

गणेशोत्सव हा कोकणकरांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही कदम कुटुंबियांच्या निवासस्थानी उत्साह, श्रद्धा आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. बाप्पाच्या आगमनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले असून, पुढील दहा दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.