गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव
घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना
गावागावात भक्तीमय वातावरण
देवरूख (प्रतिनिधी) :
आनंद, उत्साह आणि भक्तीभावाच्या वातावरणात आज लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. संगमेश्वर तालुक्यात देखील ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत बाप्पाचे आगमन झाले आहे. गणरायाच्या आगमनावेळी पावसाला सुरूवात झाल्याने गणेशभक्त काहीसे हिरमुसल्याचेही चित्र दिसून आले. परंतु लाडक्या गणरायाला घरी आणतेवेळी त्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता. गणरायाच्या आगमनाने गावागावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
सगळीकडे गणरायाचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले आहे. गणरायाची मूर्ती घरी घेवून जाण्यासाठी चित्रशाळांमध्ये नागरिकांची लगबग पहावयास मिळाली. तसेच पूजेचे साहित्य विकत घेण्यासाठी नागरिकांनी जवळच्या बाजारपेठेत गर्दी केली होती. गणेशोत्सव काळात देवरूख, संगमेश्वर, साखरपा, आरवली या बाजारपेठा सजावट साहित्यांनी सजल्या आहेत. पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावी आले आहेत. सगळीकडे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.












