सावर्डे विद्यालय तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेत उपविजेतेपद मिळवून गौरवान्वित

 “स्मार्ट शेती नाटिकेला तालुकास्तरीय मंचावर दाद”

चिपळूण (प्रतिनिधी) : राज्य विज्ञान संस्था, नागपूर यांच्या निर्देशानुसार व माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व चिपळूण विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाटोत्सव स्पर्धा नुकतीच वालोपे येथील ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल येथे पार पडली. या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचालित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे या विद्यालयाने उत्कृष्ट कलाकृती सादर करत द्वितीय क्रमांकाचे यश संपादन केले. या नाटिकेचे नाव होते- “स्मार्ट शेती”.
मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या व्यापक विषयांतर्गत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणे, तसेच आधुनिक शेतीसंबंधी विविध तंत्रज्ञानाची माहिती समाजापर्यंत पोहोचवून जनजागृती करण्याचा उद्देश या सादरीकरणातून साधला गेला. ध्रुविका माने, प्रगती बुदर, सार्थक पारधी, युवराज रसाळ, आराध्या थरवळ, निधी कुंभार, सिद्धी इंगळे व आरोही चव्हाण यांनी या नाटिकेत भूमिका साकारल्या. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयास मार्गदर्शक शिक्षक कविता हळदिवे, अविनाश पोतदार, अमित साळवी व वर्षा चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यालयाचे अभिनंदन करताना सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आ. शेखर निकम, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, सचिव महेश महाडिक, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. या यशामुळे सावर्डे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा कला, विज्ञान व सामाजिक भान यांचे सुंदर मिश्रण घडवून आणले असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.