दापोली :- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले किनारपट्टीचा प्रदेश प्लास्टिक कचऱ्याने आणि दोनशे मीटर परिसरामध्ये ऑइल मिश्रित चिकट द्राव आल्यामुळे संपूर्णतः वाळू आणि किनारा हा प्रदूषित झाला आहे .


दीड दिवसाच्या गणेश विसर्जना करिता गेले अनेक वर्षाची परंपरा राखत आंजर्ले ग्रामस्थ आंजर्ले किनाऱ्यावर श्री गणेश विसर्जना करता गेले होते. परंतु यावेळी समुद्रापर्यंत पोहचायचे कसे ?विसर्जन करायचे कसे ? वाळूमध्ये पाऊल टाकायचे कसे आणि बाप्पाचे विसर्जन कशा पद्धतीने करायचे असा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावू लागला.
गेल्या तीन पिढ्या आंजर्ले ग्रामस्थ याच पद्धतीने श्री गणेश विसर्जन या ठिकाणी करीत असतात. मात्र आज पर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेले कधीच पाहिले नाही अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
कचऱ्यातून आणि प्रदूषित झालेल्या किनाऱ्यातून कशी तरी वाट काढत आंजर्ले ग्रामस्थांनी दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन केले. मात्र त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन किनारा स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे .याच समवेत दापोली तालुका प्रशासनाने तातडीने आंजर्ले किनारा स्वच्छ करण्याकरता लक्ष द्यावे आणि सहकार्य करावे अशी मागणीही आंजर्ले ग्रामस्थांनी केली आहे.
*पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची भीती*
आंजर्ले गाव गेल्या पाच वर्षांमध्ये पर्यटनाच्या नकाशावर चमकू लागले आहे. पर्यटकांचा ओढा गावाकडे वाढत आहे. मात्र जर किनारा अस्वच्छ झाला प्रदूषित झाला तर या पर्यटनावर परिणाम होऊन आंजर्ले येथील पर्यटन व्यवसायावर देखील त्याचा विपरीत परिणाम होऊन आर्थिक गणिते बिघडतील अशी भीती आंजर्ले ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पर्यटनावर होणाऱ्या परिणामां समवेतच किनारा अस्वच्छ झाल्यामुळे निसर्ग आणि जलप्रदूषणात वाढ होऊन संपूर्ण पुढील जनजीवनच विस्कळीत होण्याची भीती देखील व्यक्त होत आहे.पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने प्रशासनाने किनारा स्वच्छता या विषयाकडे लक्ष देण्याची मागणी आंजर्ले ग्रामस्थांनी केली आहे.











