सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी तालुकास्तरीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात जनरल जगन्नाथराव भोसले शाळा क्रमांक ३ च्या सभागृहात विशेष बैठक पार पडली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीस पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक आणि गटविकास अधिकारी वासुदेव नाईक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर यांनी अभियानाचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले की, आरोग्य हा विषय लोकांच्या दैनंदिन चर्चेचा आणि कृतीचा भाग व्हावा, तसेच गावपातळीवर आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होऊन सशक्त समुदाय निर्माण व्हावा, हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.
अशी आहे नवनियुक्त समिती:
स्थापित करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सह-अध्यक्षपदी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे आणि सचिवपदी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून डॉ. प्रमोद गहाणे, डॉ. मयूरेश पटवर्धन, डॉ. पूजा पाताडे, डॉ. विक्रम मस्के, डॉ. गजानन सारंग, छाया घाडीगांवकर (CDPO), सुरेश राणे (उप अभियंता), अंकुश जंगले (विस्तार अधिकारी), रवी जाधव (NGO), सविता परब (गटशिक्षणाधिकारी) आणि विनायक गांवस (पत्रकार प्रतिनिधी) यांचा समावेश आहे.
या बैठकीला पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, प्रशांत सुकी, मायकल डिसोजा, उदय पारिपत्ये, शरद धाऊसकर, महेश धुरी, प्रथमेश सावंत यांच्यासह धनश्री मराठे, प्राजक्ता केळुसकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील ग्रामपंचायतींनी या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करून बक्षीस मिळवावे, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार आरोग्य कर्मचारी शंकर परब यांनी मानले.











