​सावंतवाडी नगरपरिषदेच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गुरुवारी सावंतवाडी नगरपरिषदेला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

​नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ही आढावा बैठक पार पडली. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण १९ प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली. यात प्रामुख्याने नगरपरिषदेचे आर्थिक व्यवहार, प्रशासकीय पारदर्शकता आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी यावर भर देण्यात आला. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

​बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून कामांची पाहणी केली. त्यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन केंद्राला भेट देऊन तेथील यंत्रणेची तपासणी केली. तसेच शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी जाऊन कामाच्या दर्जाचा आढावा घेतला. सर्व कामे दर्जेदार आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. यावेळी नगरपरिषदेचे विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.