युवतीचा बनावट अश्लिल फोटो तयार करून इन्स्टाग्रामवर प्रसारीत केल्याच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

 

आरोपीतर्फे अॅड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले

मालवण | प्रतिनिधी : इन्स्टाग्रामवर युवतीचा अश्लिल फोटो बनवून त्याची स्टोरी प्रसारीत करून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तुकाराम भिमराव सुर्यवंशी (वय २२) रा. धावडेवस्ती, भोसरी पुणे याचेविरूध्द १३ मार्च २०२२ रोजी मालवण पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि. कलम ३५४ ड, ५०० व माहिती व तंत्रज्ञान (सुधारीत) अधिनियम ६७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी आरोपीविरूध्द तपासकाम करून मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेले होते.

याकामी सरकार पक्षातर्फे एकूण ३ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीतर्फे अॅड. स्वरूप नारायण पई यांनी बाजू मांडली. आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद, फिर्यादीचे व साक्षीदारांचे जबाबातील विसंगती व तपासकामातील त्रुटी विचारात घेवून मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा सह दिवाणी न्यायाधीश यांनी आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.