मंत्री नितेश राणे आज घेणार उपोषणकर्त्या कोत्रेवाडी ग्रामस्थांची भेट 

लांजा (प्रतिनिधी) डम्पिंग ग्राउंड हटाव साठी १७ दिवस बेमुदत उपोषणाला बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांची राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे सोमवारी १ सप्टेंबर रोजी भेट घेणार आहेत .

लांजा नगरपंचायतीच्या वतीने जोर जबरदस्तीने आणि शासकीय नियम पायदळी तुडवून कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र या विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थ गेल्या चार वर्षांपासून लढा देत आहेत.मात्र तरी देखील प्रशासन दाद देत नसल्याने अखेर कोत्रेवाडी ग्रामस्थांनी १४ ऑगस्ट पासून डंपिंग ग्राउंड हटाव साठी बेमुदत लाक्षणिक उपोषण छेडलेले आहे. १७ दिवस हे लाक्षणिक उपोषण सुरूच असून प्रशासनाचा एकही सक्षम अधिकारी या ठिकाणी ग्रामस्थांची भेट घेत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झालेली आहे . याबाबत भाजपाचे माजी नगरसेवक संजय यादव यांनी रविवारी सायंकाळी मंत्री नितेश राणे यांचेशी मोबाईलवरुन संपर्क साधला होता आणि कोत्रेवाडी ग्रामस्थांची व्यथा त्यांच्याकडे मांडली होती.

या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे सोमवारी १ सप्टेंबर रोजी उपोषणकर्ते कोत्रेवाडी ग्रामस्थांची दुपारी १ ते ३ या वेळेत भेट घेणार आहेत. ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत .कोत्रेवाडी ग्रामस्थांनी याअगोदर देखील मंत्री नितेश राणे यांना निवेदन सादर केले होते. त्यामुळे या भेटीत ग्रामस्थांना निश्चितच एक सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी शक्यता आहे.