दोघांवर गुन्हा दाखल
कणकवली पोलिसांची कारवाई
कणकवली : तालुक्यातील खारेपाटण कोष्टी आळी येथे कणकवली पोलिसांनी ६० हजार ४०० रूपयांची दारू जप्त केली. या प्रकरणी प्रदीप निग्रे (रा.खारेपाटण) आणि बंटी सावंत (रा.वरवडे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खारेपाटण कोष्टीआळी येथे प्रदीप विश्वनाथ निग्रे हा त्याचे राहते घराच्या मागील बाजूस गोवा बनावटीची गैरकायदा दारू विक्री करतो अशी खबर कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, हवालदार चंद्रकांत झोरे, हवालदार पांडुरंग पांढरे, पोलीस सीमा खरात, अवधूत गुणीजन आदींनी काल रात्री साडे आठच्या सुमारास छापा टाकला. यावेळी प्रदीप निग्रे याच्या घरात गोवा बनावटीच्या दारूने भरलेले बॉक्स आढळून आले. यात रॉयल चॅलेंज, इम्पिरियल ब्ल्यू, हेवर्ड व्हिस्की, मॅकडॉल्ड नं.१, डीएसपी ब्लॅक, रॉयल स्टॅग, मेन्शन हाऊस, रॉयल चॅलेंज, ओल्ड मंक आदी ६० हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल कणकवली पोलिसांनी जप्त केला. हा सर्व माल बंटी सावंत (रा.वरवडे) याने आणून दिला अशी माहिती प्रदीप निग्रे यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार निग्रे आणि सावंत या दोहोंवर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास हवालदार मिलिंद देसाई करत आहेत.











