महिलेच्या दागिन्यांसाह रोख रक्कम अज्ञाताने केली लंपास

कणकवली : मुंबई येथून आपल्या मूळ गावी आलेल्या महिलेच्या खांद्यावरील बॅग मधील पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. या पर्स मध्ये सोन्याचे मंगळसूत्र, नथ तसेच रोख आठ हजार रुपये असा ३ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज होता. ही घटना तळेरे बाजारपेठ येथे ३१ ऑगस्ट रोजी घडली. वैशाली संतोष घाडी ( वय ४७ ,सांताक्रुझ – पूर्व, मुंबई, मूळ राहणार फणसगांव गावठणवाडी, ता. देवगड ) ही महिला ३० ऑगस्ट रोजी पती सोबत मुंबईवरून गावी यायला निघाली. तिचे पती संतोष घाडी यांच्या मित्राच्या चार चाकी गाडीतून ते ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १ : ४५ वा. च्या सुमारास तळेरे येथे पोहचले.

मुंबईहून निघताना तिने मोठे मंगळसूत्र व नथ असे दागिने तसेच आठ हजार रुपये रोख रक्कम असलेली पर्स खांद्याला अडकविण्याच्या बॅगेत ठेवली होती. तळेरे बाजारपेठ येथे खाण्याचे पदार्थ व भाजी खरेदी करण्यासाठी ती महिला बाजारपेठेत गेली. तेथील दुकानातून स्नॅक्स घेवून त्याचे पैसे बॅगेतील पर्समधून काढून दिले. त्यानंतर बाजारपेठेतीलच एका भाजी विक्रेत्याकडून भाजी खरेदी करुन पुन्हा बॅगेतील पर्समधून पैसे काढून दिले. त्यावेळी बाजारपेठेमध्ये खूप गर्दी होती. त्यानंतर ती महिला व तिचे पती बसस्थानकात जावून एसटीतून उंडील तिठा येथे उतरले. तेथून रिक्षाने फणसगाव .गावठणवाडी येथे पोहोचले. सायंकाळी ४ वाजण्याचे सुमारास बॅगेतील सामान काढण्यासाठी कपाट उघडून आत ठेवलेल्या बॅगेची खात्री केली.त्यावेळी बॅगेची मधली चेन उघडी होती. तसेच त्यामध्ये ठेवलेली दागिने व पैशांची पर्स दिसली नाही. म्हणून कपाटामध्ये व इतरत्र शोध घेतला असता ती पर्स मिळाली नाही. त्यामुळे ती पर्स चोरीस गेल्याची खात्री झाली. त्यामुळे तिने कणकवली पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.