सावंतवाडीच्या मोती तलावातील मगरीला पकडण्यात वन विभागाला यश
सावंतवाडी : सावंतवाडीतील मोती तलावात दिसलेल्या मगरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं, पण अखेर वन विभागाच्या जलद कृती दलाने तिला जेरबंद केलं आहे. या पथकाचं नेतृत्व बबन रेडकर करत होते, ज्यांनी आतापर्यंत तब्बल ३६४ मगरींना पकडण्याचा विक्रम केला आहे.
या यशामागे रामचंद्र उर्फ बबन रेडकर यांचा ४२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. वनसेवक म्हणून काम करत असताना त्यांनी वन्यप्राण्यांना वाचवण्याचं विशेष प्रशिक्षण घेतलं. आतापर्यंत त्यांनी बिबट्या, अजगर, नाग, आणि अनेक प्रकारच्या सापांना पकडून जीवदान दिलं आहे.
गेल्या वर्षी निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या अनुभवाचा सन्मान करत त्यांची वन विभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम काम करते आणि त्यात प्रथमेश गावडे, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, पुंडलिक राऊळ, आनंद राणे, देवेंद्र परब, आणि राकेश अमृसकर यांचा समावेश आहे. या टीमच्या मदतीने बबन रेडकर आजही वन्यप्राण्यांना वाचवण्याचं काम करत आहेत.











