७७ वर्षांची परंपरा असलेला देवगड तालुक्यातील एकमेव सार्वजनिक गणेशोत्सव
राजेंद्र साटम (शिरगाव) –देवगड तालुक्यातील एकमेव सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावचा राजाची प्रतिष्ठापना शिरगाव बाजारपेठेत मोठ्या भक्तिभावाने केली जाते.
शिरगाव येथील जुन्या जाणकार मंडळींनी सुरुवातीला एकत्र येऊन गणपतीची स्थापना केली. पुढे ही परंपरा सम्राट तरुण मंडळातर्फे चालवली गेली. सन १९७९ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन झाले. त्यानंतर आजतागायत शिरगाव बाजारपेठेत हा उत्सव पारंपरिक रीतिरिवाजांनुसार आणि उत्साहात साजरा केला जातो. या राजाला तब्बल ७७ वर्षांची परंपरा लाभली आहे. स्थापनेपासूनच शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा मंडळाने जपली आहे.
यावर्षी शिरगावच्या राजाची आकर्षक व सुबक मूर्ती हडपीड येथील मूर्तिकार अनंत मेस्त्री यांनी साकारली असून तिची रचना विशेष लक्षवेधी ठरली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई उमेश अनुभवणे यांनी केली आहे. तर सजावट दिशा साटम हिने केली आहे. तसेच मंडळाचे अध्यक्षपद राजाराम साटम भूषवीत आहेत.
उत्सव काळात सकाळ–संध्याकाळ पूजा–आरती, दुपार–रात्र नैवेद्य, तसेच भजन–कीर्तन व समाजप्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जातात. अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी श्री सत्यनारायण महापूजाही पार पडते.
उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रिक्षा चालक–मालक संघ, राजे ग्रुप, शिरगाव मित्र, शिरगाव व्यापारी संघटना, आर.के. फाउंडेशन अशा स्थानिक संस्थांचे मोलाचे योगदान आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देवगड पोलीस ठाणे, शिरगाव पोलीस दूरक्षेत्र व होमगार्ड यांचे विशेष सहकार्य लाभते.
अनंत चतुर्थीच्या दिवशी शिरगावचा राजा भव्य विसर्जन मिरवणुकीतून निरोप घेतो. उत्सव काळात लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी तसेच हजारो भाविक शिरगावच्या राजाचे दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेतात.













