सिंधुदुर्गचा अभिमान : दिल्लीतील अखिल भारतीय थल सैनिक शिबिरासाठी ८ कॅडेट्स !

५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, ओरोसचे यश – महाराष्ट्र संचालनालयाचे प्रतिनिधित्व करणार शिलेदार

यामध्ये फोंडा हायस्कूलची मनस्या फाले हिची अभिनंदनीय निवड !

 

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी–
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रभर झळकला आहे. ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, ओरोस या संघटनेच्या कॅडेट्सनी परिश्रम, शिस्त आणि ध्येयवेडी वृत्तीच्या जोरावर उत्तुंग यश मिळवले आहे. या बटालियनमधील आठ कॅडेट्सची निवड अखिल भारतीय थल सैनिक शिबिरासाठी (All India Thal Sainik Camp – TSC, Delhi) दिल्ली येथे झाली आहे. ही निवड केवळ कॅडेट्ससाठीच नव्हे, तर त्यांच्या शाळा, महाविद्यालये, पालक आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

महाराष्ट्र संचालनालयाचे प्रतिनिधित्व
या निवडीद्वारे सिंधुदुर्गातील आठ कॅडेट्स आता महाराष्ट्र संचालनालयाचे प्रतिनिधित्व करतील. देशातील एकूण १७ संचालनालयांमधून सर्वोत्तम कॅडेट्स या शिबिरात सहभागी होतात. राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा कॅडेट्सच्या परिश्रमांची खरी कसोटी ठरणार आहे.निवड झालेले कॅडेट्स :क्रमांक/कॅडेटचे नाव/शाळा/महाविद्यालय
स्पर्धा प्रकार–1)अनंत चिंचकर,केळुसकर न्यू इंग्लिश स्कूल, सावंतवाडी- रायफल शूटिंग 2)संस्कार धुरी-पब्लिक स्कूल, आंबोली- रायफल शूटिंग 3) मनस्या फाले- न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट- रायफल शूटिंग
4)संभाजी माने स.ह. केळकर कॉलेज, देवगड – मॅप रीडिंग 5)
क्षितिज चौकेकर- कणकवली कॉलेज, कणकवली- JDFS (स्वास्थ्य/स्वच्छता)6)मयुरेश पुजारे- स.ह. केळकर कॉलेज, देवगड- ऑब्स्टॅकल 7)साहिल शिवगण- एन टी ए कॉलेज, देवरुख- ऑब्स्टॅकल 8)राज गोसाळकर- एन टी ए कॉलेज, देवरुख- ऑब्स्टॅकल

शिबिरातील कसोटी – चार आव्हानात्मक स्पर्धा
दिल्लीतील थल सैनिक शिबिरात कॅडेट्सना खालील प्रमुख स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागणार आहे – 1. ऑब्स्टॅकल कोर्स- शारीरिक ताकद, चपळाई व सहनशक्ती सिद्ध करणारी खरी परीक्षा.2) रायफल शूटिंग – एकाग्रता, अचूकता व मानसिक स्थैर्य तपासणारी स्पर्धा.3) मॅप रीडिंग – युद्ध परिस्थितीत दिशा व नियोजन कौशल्य सिद्ध करणारी चाचणी.4)आरोग्य व स्वच्छता (JDFS) – शिस्त, समाजाभिमुखता व संघटनशक्ती दाखविणारा उपक्रम.

या सर्व स्पर्धांमधून मिळणारे गुण व स्थान २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी (RDC) निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातील या कॅडेट्सच्या यशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कठोर परिश्रम आणि नेतृत्वाचे फळ–
या यशामागे लेफ्टनंट कर्नल तनुज डी. मंडलिक यांच्या सक्षम नेतृत्वाचे आणि संपूर्ण ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या टीमचे श्रम मोलाचे आहेत. कॅडेट्सना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, शारीरिक तयारी, मानसिक धैर्य आणि शिस्त यांचा पाया बटालियननेच घातला. त्यांच्या शाळा कॉलेज मधील प्रशिक्षकांनी त्यांच्यावर मेहनत घेतली.यासोबतच सिंधुदुर्गातील मा. जिल्हाधिकारी, मा. पोलिस अधीक्षक, क्रीडा अधिकारी तसेच संबंधित शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, एएनओ (Associate NCC Officer) आणि सीटीओ (Care Taker Officer), पीआय स्टाफ यांचा वाटाही महत्त्वाचा आहे.स्थानिक प्रशासनाचा मोलाचा पाठिंबा.या प्रवासात स्थानिक प्रशासनाने दिलेला आर्थिक, तांत्रिक व नैतिक पाठिंबा निर्णायक ठरला. सुविधा, साधनसामग्री व प्रोत्साहनामुळे कॅडेट्सना आत्मविश्वास मिळाला. त्यामुळे हे यश केवळ एनसीसीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्याचा विजय ठरलाआहे.

या अभिमानास्पद निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा नाव देश पातळीवर उजळून निघाले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी हे यश नवी दिशा व प्रेरणा देणारे ठरले आहे. एनसीसीच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात, हे या यशाने सिद्ध केले.
“शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आपल्या मार्गदर्शनासाठी कायम असोत” – या भावनेने हे यश साजरे होत असून, छत्रपतींच्या आदर्शावर चालत हे कॅडेट्स भावी आयुष्यात आणखी उंच भरारी घेतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.