चिपळूण (वार्ताहर): गणेशोत्सवामध्ये आपल्याला दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे पहावयास मिळतात. त्यातून काही ठिकाणी घरगुती गणेश सजावट स्पर्धांचे आयोजन केले जाते. असेच बामणोली येथे आयोजित केलेल्या घरगुती गणेश उत्सव सजावट स्पर्धेमध्ये नवजवान मित्र मंडळ किजबिलेवाडी येथील बंधुप्रेम या नावाने परिचित असलेला चांदिवडे परिवार यांनी नारळापासून केलेल्या पर्यावरणपूरक सजावटीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. बंधुत्वाचा बाप्पा ही संकल्पना सर्वांना आवडली.
मुंबई क्रीडा मंडळ बामणोली यांच्या वतीने घरगुती गणेश उत्सव सजावट स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. गावातून याला उत्तम प्रतिसाद मिळतो.
यावर्षी बंधुत्वाचा बाप्पा चांदिवडे परिवार यांनी नारळापासून देखावा साकारला. कोकणात नारळाला कल्पवृक्ष संबोधले जाते.याच कल्पवृक्षाच्या माध्यमातून अतिशय सुरेख कलाकृती साकारली होती. नारळाच्या झाडाचा प्रत्येक भागाचा उपयोग या मकर सजावटीसाठी केला होता. या सजावटीमध्ये त्यांनी करवंटी, झाप, सुंब, नारळ फळ या सर्वांचा वापर केला होता. त्यांच्या कलाकृतीला प्रथम क्रमांक देण्यात आला. निवड समितिने पर्यावरण पूरक देखावा म्हणून सर्वांनी कौतुक केले आहे. प्रकाश चांदिवडे, सुरेश चांदिवडे आणि सर्व बंधू यांच्या बंधुत्वाचा बाप्पा संकल्पना सर्वांना आवडली. मुंबई क्रीडा मंडळ बामणोली यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे चांदिवडे परिवाराने आभार मानले आहेत.













