पुनर्वसनात अधिकाऱ्यांची मस्ती नको ; अन्यथा एक दिवस बांधून ठेवणार – आमदार नितेश राणे आक्रमक

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, समस्या मार्गी लावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे बांधकाम बंद करायचे नाही : अधिकाऱ्यांना दिली तंबी

आखवणे, भोम अरुणा प्रकल्पग्रस्तांची बैठक संपन्न

वैभववाडी  l प्रतिनिधी : अरुणा प्रकल्प पुनर्वसन मधील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. मग कामे प्रलंबित का ? अधिकाऱ्यांना जनतेच्या मागण्या, समस्या पूर्ण करता येत नसतील तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात असे खडसावत आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. भूखंड आरक्षित करतानाच मंदिर कुठे, स्मारक कुठे, या जागा ठरलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ बांधत असलेले स्मारकाचे काम बंद करायचे नाही. काम चालू करायचं. दुसरा कसा कोण मस्ती करतो ते मी पाहतो. असा सज्जड दमही आमदार नितेश राणे यांनी दिला.

आखवणे, भोम अरुणा प्रकल्प पुनर्वसन मधील प्रलंबित प्रश्नाबाबत बैठक आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत मांगवली पुनर्वसन मध्ये पार पडली. यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, कार्यकारी अभियंता हर्षद यादव, अप्पर जिल्हाधिकारी श्री बर्गे, पुनर्वसन अधिकारी श्री भोसले, तहसीलदार दिप्ती देसाई, पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, माजी सभापती शारदा कांबळे, सरपंच आर्या कांबळे, रंगनाथ नागप, शरद कांबळे, डॉ. जामदार आकाराम नागप व प्रकल्पग्रस्त नागरिक, महिला, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत प्रकल्पग्रस्त महिलांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महीलांनी आपली खदखद आमदारांसमोर व्यक्त केली. पुनर्वसनात लाईट व पाण्याचा पत्ता नाही. बिबट्याचा वावर पुनर्वसनात सुरू आहे असे सांगितले. यावर आमदार नितेश राणे यांनी आठ दिवस पाणी तुमच्या घरी नसेल तर तुम्ही गप्प बसाल का ? असा सवाल अधिकाऱ्यांना केला. काही कामांची प्रशासकीय मान्यता झाली नसल्याचे हर्षद यादव यांनी सांगितले. इतर कामे प्रशासकीय मान्यतेपूर्वी कशी करता ? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी अधिका-यांना केला. हे खपवून घेणार नाही. पुनर्वसन येथील जनता कशी राहते हे पाहण्यासाठी एकदा 24 तास अधिकाऱ्यांना डांबून ठेवणार असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

मी आता सत्तेतील आमदार आहे. त्यामुळे मंत्रालयातील कामे माझ्यावर सोपवा. ती करून देण्याची जबाबदारी माझी राहील असे अधिकाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी सांगितले. पुनर्वसन करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांची यापुढे दर महिन्याला एका तारखेला मिटिंग लागलीच पाहिजे. अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी तहसीलदार दिप्ती देसाई यांना दिल्या आहेत. वयोवृद्ध महिला तळमळीने बोलत आहेत. यात त्यांची चूक काय ? तुमचा राग आमच्यावर काढत आहेत. यात आमदार, मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची काय चूक. पाण्यासारखा प्रश्न जर स्थानिक अधिकारी सोडवत नसतील तर ही बाब गंभीर आहे. तुमच्या घरचं पाणी आम्ही मागतोय का? सुविधा द्या. आणि मोकळ करा. अशा सुचना आमदार नितेश राणे यांनी दिल्या. भालचंद्र साठे यांनी देखील अधिकाऱ्यांना खडसावत प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत, तर सर्व प्रकल्पग्रस्त आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला.

भोम बौद्ध विकास मंडळ मुंबई, ग्रामीण व महिला मंडळ यांच्या वतीने सुरू असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांधकामाची आ. नितेश राणे यांनी पाहणी केली. हे काम आरक्षित भूखंडावर सुरु आहे. ते काम अधिकाऱ्यांनी बंद करू नये. स्थानिक ग्रामस्थांनी उद्यापासून काम सुरू करायचे. असे आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांसमोर सांगितले. पार पडलेल्या बैठकीला भालचंद्र साठे, डॉ. जामदार, आकाराम नागप, रंगनाथ नागप अभय कांबळे, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.