सावंतवाडी: शहरातील सर्वोदय नगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला असून, त्यापैकी दोन ठिकाणी चोरी करण्यात ते यशस्वी झाले आहेत. या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ ते ६ च्या दरम्यान या घटना घडल्याची शक्यता आहे. चोरट्यांनी सर्वोदय नगरमधील चार घरांना लक्ष्य केले. शिक्षक कॉलनीतील रघुनाथ गवस यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले.
चोरट्यांनी घरातून ५,००० रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. तसेच, गोल्डन बेली बिल्डिंगमधील ज्ञानेश्वर यशवंत पाटकर यांच्या रूमचे कुलूप तोडून कपाटातील २५,००० रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. याव्यतिरिक्त, शिरोडा नाका येथील दुर्वांकुर अपार्टमेंटमधील चंद्रकांत निगुडकर यांच्या फ्लॅट क्रमांक ३ आणि मनोदय अपार्टमेंटमधील महेश बागवे यांच्या रूम क्रमांक २०२ मध्येही चोरीचा प्रयत्न झाला, मात्र येथे चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, उपनिरीक्षक माधुरी मुळीक, उपनिरीक्षक लोहकरे आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे करत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.













