निवळी उतारावर कंटेनर पलटी; चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी | प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी कोकजेवठार-सुतारवाडी येथील उतारात भरधाव कंटेनर पलटी होउन झालेल्या अपघातात गंभिर जखमी चालकाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी सकाळी 6.45 वा.सुमारास घडली.

सुभाष जगतपाल वर्मा (23,रा.बंन्डा,खुटार,छातरपुर, प्रतापगड,उत्तरप्रदेश) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिस पाटील संजना संजय पवार (41,रा.निवळी कोकजेवठार,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, श्ाुक्रवारी सकाळी सुभाष वर्मा हा आपल्या ताब्यातील कंटेनर (एमएच-46-बीबी-1537) मधून ऑक्सिजन व हेलियम गॅस घेउन जयगड ते मुंबई असा भरधाव वेगाने जात होता. तो निवळी बावनदी-सुतारवाडी येथील उतारातील वळणात आला असता सुभाषचा कंटनेरवरील ताबा सूटला त्यामुळे कंटेनर उलटून अपघात झाला. यात गंभिर जखमी झालेल्या सुभाषला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या टिमसह घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी अपघाताची पंचनामा करुन कंटेनर बाजुला करत रहदारी सुरळीत केली. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून स्वतःच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी चालक सुभाष वर्मावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.