रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी दुर्वास पाटील याने वाटद-खंडाळा येथील राकेश जंगम (वय २८) याचाही खून केल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. चौकशीत त्यानेच ही कबुली दिल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून आंबा घाट परिसरात दिवसभर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही.
प्रवासादरम्यान खून
दुर्वास पाटील याने ‘कोल्हापूरला जायचे आहे’ असे सांगून राकेशला गाडीत सोबत घेतले. खंडाळा ते कोल्हापूर प्रवासादरम्यान त्याचा गळा आवळून खून केला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह आंबा घाटातील खोल दरीत फेकून दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
एक वर्षापूर्वी घडलेली घटना
६ जून २०२४ रोजीच राकेशचा खून करून मृतदेह दरीत टाकल्याची कबुली आरोपीने दिली. यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली. लांजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम यांनी राखीव पोलिस दलासह घटनास्थळी दाखल होत कारवाईचे नेतृत्व केले. देवरूख पोलिस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे यांच्यासह सुमारे ३० जणांच्या पथकाने परिसर पिंजून काढला.
दोरीच्या सहाय्याने दरीत शोध
सकाळपासून सुरू झालेली शोधमोहीम सायंकाळपर्यंत अखंड सुरू राहिली. पोलिस जवानांनी दोरीच्या साहाय्याने थेट दरीत उतरून राकेशचा सांगाडा शोधण्याचा प्रयत्न केला. तब्बल ५ तास प्रयत्न करूनही काहीच निष्पन्न झाले नाही.
या शोधमोहीमेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देवरूख पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी दिली.
अद्याप पोलिसांच्या हाती कोणताही पुरावा लागलेला नसल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.












