हळदीच्या कार्यक्रमातून दारू हद्दपार; देवडे चिंचवलकरवाडीचा क्रांतिकारी निर्णय

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावातील चिंचवलकरवाडी येथे स्थानिक ग्रामस्थ, मुंबईतील रहिवासी आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त बैठकीत लग्नातील अनिष्ट आणि खर्चिक प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, हळदीच्या कार्यक्रमात दारू देण्याची प्रथा तात्काळ बंद करण्यात आली आहे. यापुढे यजमानाने दारू आणल्यास त्यांच्या लग्नकार्यात सहभागी होणार नाही, असेही एकमताने ठरवण्यात आले.

हे आहेत नवे नियम

लग्नाचा बस्ता: आता फक्त घरातील सदस्य आणि वाडीतील एक-दोनच व्यक्ती जातील.

घरबघणी प्रथा बंद: घरबघणीच्या कार्यक्रमात जेवणाचा अनावश्यक खर्च होत असल्याने ही प्रथा रद्द.

आगरी हळद: लग्नाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या आगरी हळदीत दारू-मांसाहारास मज्जाव.

मुंबईतील लग्न: जर लग्न मुंबईत असेल तर आगरी हळदीला फक्त शेजारी-मित्र यांनाच बोलवायचे; वाडीतील सर्व ग्रामस्थांना बोलवायचे नाही.

हळद उतरवणी: या कार्यक्रमातही दारूस बंदी. नियम मोडल्यास लग्नकार्यात कोणी सहभागी होणार नाही.

या बैठकीस मंडळाचे अध्यक्ष दयानंद चिंचवलकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. शशिकांत चिंचवलकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता चिंचवलकर, सोमलिंग स्पोर्ट्स सचिव गौरव चिंचवलकर, तसेच आत्माराम चिंचवलकर, सुरेश चिंचवलकर, विजय चिंचवलकर, बाळकृष्ण जाधव, सुरेश तळेकर, कांशीराम माईल, शांताराम नलावडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

महागाईच्या काळात लग्नसराईतील अनावश्यक खर्च टाळावा, तसेच तरुण पिढीला योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने चिंचवलकरवाडीने घेतलेले हे पाऊल कौतुकास्पद ठरले आहे.