राजापूर रोड रेल्वे स्टेशनवर ‘नेत्रावती एक्सप्रेस’ला थांबा मंजूर

राजापूर | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी करण्यात आलेल्या मागणीला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनंतर, रेल्वे मंत्रालयाने लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस (गाडी क्रमांक १६३४५/१६३४६) या गाडीला राजापूर रोड येथे थांबा देण्यास मान्यता दिली आहे.

या संदर्भात, २१ मे २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले होते. कोकण रेल्वेवरील राजापूर रोड स्टेशन हे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांसाठी, तसेच आंबा आणि काजू व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. सांगलीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेली मागणी लक्षात घेऊन, मुख्यमंत्र्यांनी या स्टेशनवर नेत्रावती एक्सप्रेस आणि मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला थांबा देण्याची विनंती केली होती.

या पत्राला उत्तर म्हणून, २ ऑगस्ट २०२५ रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. त्यात त्यांनी कळवले की, राजापूर रोड रेल्वे स्टेशनवर गाडी क्रमांक १६३४५/१६३४६ लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेसला थांबा देण्याची विनंती स्वीकारण्यात आली आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.