रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कृषी सल्ले दिले आहेत.
सध्या खरीप भात पिक पोटरी ते फुलोरा अवस्थेत असल्याने पिकाला पाण्याची पातळी ५ ते १० सें.मी. ठेवावी, बांध घट्ट करून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे. पावसाची उघडीप पाहूनच खतांचा दुसरा हप्ता तसेच कीटकनाशक व बुरशीनाशक फवारणी करावी.
भात पिकात खोडकिडी, सुरळीतील अळी, निळ्या भुंगेरे यांसारख्या किडींचा तसेच करपा, पर्णकोर करपा व पर्णकोर कूज या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शेतांचे नियमित निरीक्षण करून वेळेवर फवारणी करावी, असे सुचविण्यात आले आहे.
नागली व वरी पिकात गोगलगाय या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. यासाठी गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात. नारळ पिकात ‘कोंब कुज’ तर आंबा व काजू पिकात ‘फांदेमर’ या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुपारी व हळद पिकांवरही रोग-कीड वाढण्याची शक्यता असल्याने योग्य वेळी फवारणी व छाटणी करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
हा कृषी सल्ला पत्रक ग्रामीण कृषि मौसम सेवा, दापोली यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.












