रत्नागिरीतील सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी महेंद्र कांबळे यांचं निधन

रत्नागिरी: रत्नागिरी येथील माळनाका येथील शासकीय विश्रामगृहातील सेवानिवृत्त चौकीदार महेंद्र धोंडीराम कांबळे (वय ६२, रा. पाली, मठ रत्नागिरी) यांचं सोमवारी रात्री निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

महेंद्र कांबळे यांनी शासकीय सेवेत ३८ वर्षे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा बजावली होती. गेल्या मे महिन्यातच ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांची कर्तव्यनिष्ठा, साधेपणा आणि मृदू स्वभाव या गुणांमुळे त्यांची समाजात एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या निधनाने शासकीय विश्रामगृह आणि बांधकाम विभागातील कर्मचारी, तसेच त्यांच्या मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी पाली मठ येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे