सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने सावंतवाडी तालुक्यातील माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ‘स्वरचित काव्य वाचन स्पर्धा’ आयोजित केली आहे. या स्पर्धेत प्रत्येक शाळेतून १ विद्यार्थी सहभागी होऊ शकतो. सर्व माध्यमिक शाळांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कोमसापचे तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांनी केले आहे.
कोकणातील साहित्याचा वारसा जपण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये लेखन-वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी काही नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये वयोगट ८ वी ते १० वी असून, स्पर्धकांनी आपली स्वतः रचलेली (स्वरचित) कविता सादर करायची आहे. स्पर्धकाचे नाव, मोबाईल नंबर आणि कविता दीपक पटेकर यांच्याकडे देणे बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेतून केवळ १च स्पर्धक ग्राह्य धरला जाईल. कवितेला १२ ते २४ ओळींची मर्यादा असून, ती मराठी किंवा मराठीच्या बोलीभाषेत असावी. सादरीकरणासाठी प्रत्येक स्पर्धकाला ३ मिनिटांचा वेळ दिला जाईल.
ही स्पर्धा २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. स्पर्धेचे ठिकाण आणि वेळ निवड झालेल्या स्पर्धकांना ७ दिवस आधी कळवली जाईल. स्पर्धेस येण्याजाण्याचा खर्च आणि जबाबदारी स्पर्धक, शिक्षक किंवा पालकांची राहील.
या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. पहिल्या क्रमांकाला रोख रु. ५०० आणि प्रमाणपत्र, दुसऱ्या क्रमांकाला रोख रु. ३०० आणि प्रमाणपत्र तर तिसऱ्या क्रमांकाला रोख रु. २०० आणि प्रमाणपत्र दिले जाईल. याव्यतिरिक्त, २ उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी रु. १०० दिले जातील. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळेल.










