सासोलीत पायवाटेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी

दोडामार्ग पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी फिर्याद दाखल

​दोडामार्ग (प्रतिनिधी): तालुक्यातील सासोली – गणेशवाडी येथे पायवाटेच्या वादातून गवस व सडजी कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासोली गणेश वाडी येथील सुनील अर्जुन गवस (वय ६३) हे संकेत सडजी यांच्या जमिनीतील पायवाटेने ये – जा करायचे. संकेत प्रशांत सडजी याने त्याच्या मालकीच्या जागेतून जाणाऱ्या वाटेवर लोखंडी पाईपचे गेट लावून रस्ता अडवला होता. यामुळे, फिर्यादी सुनील गवस यांनी विचारणा केली असता त्यांच्यात बाचाबाची झाली. ​यावेळी संकेत सडजी याने बांबूच्या काठीने फिर्यादी सुनील गवस यांना मारहाण केली. यात त्यांच्या दोन्ही पायांना, पाठीला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच संकेत याने हात-पाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद सुनील गवस यांनी दिली. त्यानुसार संकेत सडजी याच्यावर भादंवि कलम ११८(१), ३५१(१), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात प्रज्ञा प्रशांत सडजी (वय ४३, रा. सासोली गणेशवाडी) यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी प्रज्ञा सडजी यांच्या मालकीच्या जागेत बसवलेले गेट सुनील गवस, त्यांची पत्नी व मुलगा यांनी हलवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांचे पती व मुलाने त्यांना हटकले. यावरून तिघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी सुनील गवस याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या पतीच्या डाव्या हाताच्या करंगळीवर मारून दुखापत केली. तसेच सुजय गवस याने बांबूच्या दांड्याने फिर्यादीच्या मुलाच्या उजव्या हाताच्या मनगटावर मारले. तसेच आम्ही तुम्हाला मारून टाकणार अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

त्यानुसार पोलिसांनी सुनील अर्जुन गवस (वय ६३), सुनेत्रा सुनील गवस (वय ४५) आणि सुजय सुनील गवस (वय ३०) या तिघांवर भारतीय न्याय संहिताच्या कलम ११८(१), ३५१(१), ३५२, आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
​या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक केरकर करत आहेत.