‘वास्को ते वेंगुर्ला’ आणि ‘पणजी ते वेंगुर्ला’ अशा दोन बस सेवा

हेमंत मराठे यांनी मानले कदंबा प्रशासनाचे आभार 

सावंतवाडी । प्रतिनिधी : वेंगुर्ला आगाराच्या नियोजनशून्य कारभाराला कंटाळलेल्या प्रवाशांसाठी गोवा राज्याच्या कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलासा दिला आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेत, केटीसीएलने ‘वास्को ते वेंगुर्ला’ आणि ‘पणजी ते वेंगुर्ला’ अशा दोन बस सेवा सुरू केल्या आहेत. या निर्णयाबद्दल मळेवाडचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी केटीसीएलचे आभार मानले आहेत.

वेंगुर्ला आगाराच्या भोंगळ कारभारावर श्री. मराठे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वेंगुर्ला-सातार्डा बसफेरीच्या अनियमित नियोजनामुळे सामान्य प्रवासी, विशेषतः विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत होता. ही बससेवा तात्काळ पूर्ववत न केल्यास वेंगुर्ला आगाराची एकही बस मळेवाड गावातून पुढे जाऊ देणार नाही, असा इशारा श्री. मराठे यांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर गोव्याच्या केटीसीएलने सकारात्मक प्रतिसाद देत मळेवाड मार्गे दोन अतिरिक्त बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल बोलताना श्री. मराठे म्हणाले, “राज्याच्या एसटी परिवहन महामंडळाकडून प्रवाशांचे हाल होत असतानाही योग्य नियोजन झाले नाही. पण परराज्यातील असूनही कदंबाने प्रवाशांचे हित लक्षात घेतले, याचा आम्हाला आनंद आहे. वेंगुर्ला आगाराने यातून काहीतरी बोध घ्यावा.”

नवीन सुरू झालेल्या या बससेवेचा फायदा सर्व प्रवाशांना होणार आहे. मळेवाड येथील प्रवाशांच्या वतीने या बसचे स्वागत केले जाईल, असेही श्री. मराठे यांनी यावेळी सांगितले.