जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी विरोधकांना सुनावले खडे बोल
वेंगुर्ले l प्रतिनिधी :सत्तास्थानाच्या काळात ज्यांनी कधीही जिल्हास्तर, तालुकास्तर ना ग्रामस्थरावर जनता दरबार घेतला नाही त्यांनी दुसऱ्यावर आरोप करू नये. कारण जनता दरबार घेण्यासाठी जनतेमध्ये थेट जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्याला न्याय देण्यासाठी, संवाद करण्यासाठी हिम्मत असावी लागते असा अप्रोधिक टोला जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी आज वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे सेनेच्या पदाधिका-यांना लगावला. कारण वेंगुर्ले येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या झालेल्या जनता दरबारामध्ये जनतेचे ७० टक्के पेक्षा जास्त निवेदनांचे प्रश्न त्याचठिकाणी मार्गी लागले आहेत. उर्वरित काही प्रकरणात जी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे ती झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत उर्वरित प्रकरणे मार्गी लागतील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांनी वेंगुर्ले भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्याची ताकद पालकमंत्री नितेश राणे यांच्यामध्ये आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्हास्तरा नंतर आता तालुकास्तरावर जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे. त्याला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
उद्धव सेनेच्या पदाधिका-यांनी हे लक्षात ठेवावे की, सत्तास्थानाच्या काळात त्यांनी कधीही अशा प्रकारचा ना जिल्हास्तरावर कोणता जनता दरबार घेतला ना तालुकास्तरावर, ना गावपातळीवर घेतला. कारण जनता दरबार घेण्यासाठी जनतेमध्ये थेट जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्याला न्याय देण्यासाठी, संवाद करण्यासाठी हिम्मत असावी लागते, पारदर्शकता असावी लागते. प्रशासकीय बाब जर या टीका करणा-या लोकांच्या लक्षात येत नसेल की प्रशासकीय बाबींमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार त्या त्या विभागाच्या अधिका-यांना असतात. पालकमंत्री यांनी निर्देश दिल्यानंतर त्या निवेदनावर कोणत्या प्रकारची कार्यवाही करणे अपेक्षित आहे किवा कोणती कार्यवाही करणार आहेत याची उत्तरे त्याठिकाणी समोरासमोर संबंधित अधिका-यांच्या माध्यमातून घेण्यात आली आहेत.
ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्याला चांगलं म्हटलं पाहिजे चांगल्या गोष्टींना स्वीकारलं पाहिजे. जनतेचे प्रश्न सुटत असतील तर कोणाला वाईट वाटण्याचं करण नाही. आपले अपयश पुढे येईल अशा प्रकारची भीती जर उद्धव सेनेच्या लोकांना वाटत असेल तर तो तुमचा दोष आहे. या जनता दरबाराबद्दल सामान्य जनता समाधान व्यक्त करत आहे. या सर्वांच्या माध्यमातून लोकाभिमुख कारभार करण्याचा पालकमंत्री यांचा मानस असल्याचे दळवी म्हणाले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष विष्णू परब, माजी मंडळ अध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रीत साई प्रसाद नाईक आदी उपस्थित होते.













