RATNAGIRI : जिल्हा बँक अपहार प्रकरणी शाखाधिकार्‍याचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला

रत्नागिरी ः प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतून 50 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या अपहार प्रकरणातील कॅशियर ओंकार कोळवणकरवर शहर पोलिसांकडून कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी बँकेचा शिपाई अमोल मोहितेला पोलिसांनी अटक केली असून काही दिवसांपूर्वीच शाखाधिकारी किरण विठ्ठल बारयेचा अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या तिघांनी संगनमताने 18 फेब्रुवारी 2025 ते 4 ऑगस्ट 2025 या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेत तारण ठेवण्यात आलेल्या नागरिकांचे दागिने बँकेच्या तिजोरित ठेवताना त्यातील काही दागिने परस्पर लांबवत होते. अशा प्रकारे त्यांनी 6 महिन्यांमध्ये एकूण 504.34 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. दरम्यान, काही दिवसांनी या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यावर शहर पोलिस ठाण्यात तिन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रथम बँकेचा शिपाई अमोल मोहितेला अटक केली. त्यानंतर अन्य दोन संशयितांचा शोध घेत असताना किरण बारयेने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला. त्यामुळे शहर पोलिस त्याचा शोध घेत असून बँकेचा कॅशियर ओंकार कोळवणकरवर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे