सायबर चोरांचा नवा फंडा उघड
पोलीस व तपास यंत्रणांच्या नावाने नागरिकांना गंडा
पुण्यात सायबर चोरट्यांनी डिजिटल अटकेचा बनाव रचत एका 80 वर्षीय निवृत्त राज्य सरकारी अधिकाऱ्याची 19 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला पोलीस आणि तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत आरोपींनी वृद्धाला भीतीच्या वातावरणात अडकवले. खोट्या नोटिसा, व्हिडिओ कॉल आणि गंभीर गुन्ह्यांचे आरोप करत पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले. पैसे परत न मिळाल्याने अखेर पीडिताच्या मुलाने तक्रार दाखल केली. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) डीजीपी आणि गुन्हे शाखेतील वरिष्ठ कर्मचारी असल्याचा बनाव करून सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये डिजिटल अटक फसवणूक करत एका 80 वर्षीय निवृत्त राज्य सरकारी अधिकाऱ्याची तब्बल 19 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडिताच्या मुलाने ऑनलाइन तक्रार दाखल केल्यानंतर प्राथमिक तपासानंतर बुधवारी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिघी पोलीस उपनिरीक्षक दीपक रहाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पीडित वृद्धांना अनओळखीचा फोन आला होता. फोन करणाऱ्याने स्वतःला मुंबई गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगितले. आधार तपशीलाचा गैरवापर करून एका बँकेची 247 डेबिट कार्डे काढण्यात आली असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा आरोप त्याने केला. तसेच वृद्ध व्यक्ती एका टोळीचा सदस्य असून मनी लॉन्ड्रिंगमध्ये गुंतलेला आहे, असेही खोटे सांगण्यात आले.
यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून अंमलबजावणी संचालनालयाकडील (ED) बनावट नोटीस दाखवण्यात आली. या नोटीसमध्ये गुन्हा दाखल झाल्याचा दावा करण्यात आला होता. कॉलरने कुटुंबीय किंवा मित्रांशी याबाबत चर्चा केल्यास अटक केली जाईल, अशी धमकी देत वृद्धावर मानसिक दबाव टाकला.
त्यानंतर स्वतःला ACB चा डीजीपी दर्जाचा अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीने पुन्हा फोन केला. अटकेपासून वाचवण्याचे आश्वासन देत ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निधी’मध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. पीडिताच्या बँक खात्याचा तपशील मिळवून 19 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले गेले. पडताळणीनंतर पैसे परत दिले जातील, असे आश्वासनही देण्यात आले.
बराच काळ लोटूनही पैसे परत न मिळाल्याने वृद्ध व्यक्तीने आपल्या मुलाला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर प्रहार डिजिटलच्या माहितीनुसार प्रकरण उजेडात आले असून पोलीस तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.












