जीवन विकास सेवा संघ व ओतारी आई चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे चष्मे वाटप

चिपळूण (प्रतिनिधी) : जीवन विकास सेवा संघ आणि ओतारी आई चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळ वडनाका येथे घेण्यात आलेल्या नेत्र चिकित्सा शिबिरातील लाभार्थ्यांना संस्थेच्या कार्यालयात चष्मे वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. निवृक्त मुख्याध्यापक, लेखक चंद्रकांत कुलकर्णी, संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा उ‌द्योजिका संगीता ओतारी यावेळी उपस्थित होत्या.
स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला लाभार्थ्यांसह चिपळूणकरांनी प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना आरोग्य विभागाच्या प्रमुख सौ. पूजा पुजारी यांनी संस्थेच्या आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती देत महिलांसाठी घेण्यात येत असलेल्या व संस्था मोफत देत असलेल्या उपचार प्रणालीची माहिती दिली. युवतींसाठी संस्थेत घेण्यात येत असलेल्या योग, ध्यान, प्राणायाम व शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक वाटणाऱ्या झुम्बा क्लासेसची माहिती दिली. संस्थेचे मानसशास्त्रज्ञ दिपक माळकरी यांनी मानसशास्त्रीय समुपदेशनाची आजच्या समाजाला किती गरज आहे. हे उदाहरणासह स्पष्ट करून संस्थाध्यक्ष असलेल्या संगीता ओतारी यांच्या विधायक व दूरदृष्टी ठेऊन राबवीत असलेल्या उदात्त विचारसरणीची प्रसंशा केली. आजच्या पिढीने त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या नवतंत्रज्ञानाचा लाभ गरजूंनी आवश्यक घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. तेजस ओतारी यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातही गणेशोत्सव दरम्यान आयोजित केलेल्या नेत्र चिकित्सा शिबिरात व आरोग्य शिबिरात उपस्थित राहून संपूर्ण सहकार्य केल्याबद्दल यांचा लेखक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यार आला. प्रमुख चंद्रकांत कुलकर्णी यांनी संस्थेला शुभेच्छा देताना व चष्म्यांच्या माध्यमातून योग्य दृष्टी देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत संगीता ओतारी यांच्या दान आणि दातृत्व शैलीचे कौतुक केले. कुसुमाग्रजांच्या पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा या उक्तीने संस्थेच्या उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. अनोपचारिक चर्चेत अच्युत गोडबोले यांच्या वाचलेल्या मानसशास्त्रीय पुस्तकाचेही दाखले दिले.