संसदीय कार्य व अल्पसंख्याक मंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते पुरस्काराचे झाले वितरण
वेंगुर्ले l दाजी नाईक :मुंबई विद्यापीठाचा ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांना प्राप्त झाला. संसदीय कार्य व अल्पसंख्याक मंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर च्या संचालक मंडळाचा आनंद ओसंडून वाहत होता. या पुरस्काराने सामान्य मच्छीमार, शेतकरी, कामगार यांच्या मुलांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रयत्नांचा समाजमान्य हा सन्मान झाला.
मुंबई येथे हा मानाचा पुरस्कार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई, पेट्रोन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी यांनी स्वीकारला. यावेळी केंद्रीय सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. रवींद्र कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय भामरे, तसेच कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वेंगुर्ले महाविद्यालयाचा इतिहास केवळ एका इमारतीचा किंवा काही अभ्यासक्रमांचा नाही. तो समाजपरिवर्तनाचा इतिहास आहे. १९४५ साली प्रिं.एम.आर. देसाई आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी स्थापन केलेल्या शिक्षण प्रसारक मंडळाने “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हा ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारून वंचितांना शिक्षण देण्याचा निर्धार केला. त्या काळात शिक्षण ही चैनीची वस्तू समजली जात होती. गरीब, शेतकरी, मजूर यांच्या मुलांना शिकण्याची संधीच नव्हती. पण ह्या विचारवंतांनी ज्ञान हीच खरी शक्ती आहे हे ओळखून शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि कागल विद्यालय सुरू केले.त्या शाळेतून प्रारंभ झालेली ज्ञानयात्रा पुढे कोल्हापूरात गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय उभारण्यात पोहोचली. त्याचबरोबर मुरगुड, पेठवडगाव, कागल, सेनापती कापशी येथे शाखा सुरू झाल्या. मंडळाच्या ज्ञानतपस्वी यांनी तेव्हा ठरवलं की ज्ञान केवळ शहरी मर्यादांमध्ये अडकून राहता कामा नये. ते खेडोपाडी, डोंगरकप्पारी, समुद्रकिनारी पोहोचले पाहिजे. हाच विचार घेऊन १९६१ मध्ये वेंगुर्ल्यात शिक्षण प्रसारक मंडळाने पाय रोवला.
वेंगुर्ला किनाऱ्यावरील हे बंदरशहर त्या काळात शैक्षणिक दृष्ट्या उपेक्षित होते. विद्यार्थी दहावीपर्यंत शिकायचे, त्यानंतर त्यांना कोल्हापूर किंवा बाहेरचा रस्ता धरावा लागे. शेतकरी, मासेमार कुटुंबांच्या मुलांना हे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत शिक्षण प्रसारक मंडळाने “वेंगुर्ला महाविद्यालय” सुरू केले. पालकांची साथ मिळाली. समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पण संघर्ष प्रचंड होता. पैसा कमी, साधने अपुरी; पण संस्थापकांची जिद्द अफाट होती. या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते खासदार, उत्कृष्ट संसदपटू बॅ. बाळासाहेब खर्डेकर. त्यांचे इंग्रजी विषयातील ज्ञान आणि अभ्यासक वृत्तीने महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल स्थिरावली. त्यांच्या निधनानंतर १९६५ मध्ये महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले आणि ते आजतागायत कोकणाच्या शैक्षणिक नकाशावरील तेजस्वी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचार्य, संस्कृत पंडित तसेच आमदार म्हणून बहुआयामी कार्य करणाऱ्या प्रा. एम. आर. देसाई यांनी आपल्या सखोल ज्ञान, प्रगल्भ दृष्टीकोन आणि कुशल प्रशासनाच्या बळावर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याचा आलेख सातत्याने उंचावत नेला. त्यांच्या नेतृत्वामुळे मंडळाने केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही नवनवीन उपक्रम राबवत व्यापक जनमानसात विश्वास आणि आदर संपादन केला.
प्रारंभी महाविद्यालयात कला व वाणिज्य हेच विभाग होते. हुशार, होतकरू मुलांना विज्ञान शिकायचे असेल तर त्यांना सावंतवाडी किंवा कोल्हापूर गाठावे लागायचे. पालकांची यातून मोठी गैरसोय होत होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी १९९२-९३ मध्ये विज्ञान शाखा सुरू करण्यात आली. पण प्रयोगशाळा, उपकरणांसाठी आवश्यक निधीचा प्रश्न उभा राहिला. इथे पुढे आले बीकेसी असोसिएशनचे समाजप्रेमी, आंबा बागायतदार, सारस्वत बँक आणि स्थानिक उद्योजक. त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रयोगशाळा उभारत आली. तत्कालीन खासदार एकनाथ ठाकूर यांनी २५ लाख रुपये खासदार निधीतून दिले आणि विज्ञान विभागाची भक्कम पायाभरणी झाली.आज विज्ञान विभाग हा महाविद्यालयाचा कणा आहे. येथून अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, संशोधक म्हणून घडले आहेत.महाविद्यालयाच्या शैक्षणिक सुविधा वर्षाकाठी सुधारणाऱ्या राहिल्या.आज सुसज्ज ग्रंथालय, संगणक केंद्र, भौतिक-रसायन-वनस्पतीशास्त्र प्रयोगशाळा, विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वसतिगृह, खेळांसाठी जिमखाना अशा सर्व सुविधा आहेत.
विद्यमान प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी आधुनिक दृष्टिकोन घेऊन कार्यरत आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती शिवानी देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई, सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रोन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, संस्था प्रतिनिधि सुरेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य प्रो.डी. बी. गोस्वामी यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाविद्यालय प्रगतीच्या प्रवासावर आहे. महाविद्यालयाने मिळवलेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून महाविद्यालयाचे अभिनंदन होत आहे.











