माजगावच्या ‘ओंकार महापुरुष’ भजन मंडळाने सोलापुरात जिंकली मने!

शुभराय मठात शंकर महाराजांच्या महतीवर स्वरचित अभंगांची भक्तीमय सेवा

सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगाव येथील ‘ओंकार महापुरुष’ भजन मंडळाने सोलापुरात आपली भक्तीची छाप सोडली आहे. शुभराय मठात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात या मंडळाने सादर केलेल्या स्वरचित सुश्राव्य भजनांनी मठातील भाविक मंत्रमुग्ध झाले. विशेष म्हणजे, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्य असलेल्या शंकर महाराज आणि इतर देवतांच्या महतीवर आधारित स्वतः रचलेले अभंग सादर करून या मंडळाने मठाच्या ट्रस्टींची शाबासकी मिळवली.

मंडळाचे प्रमुख गायक एच. बी. सावंत यांनी स्वतः रचलेले अभंग आणि गीते सादर करून भाविकांची मने जिंकली. त्यांच्या अभंगांनी शंकर महाराजांच्या आठवणी जागृत केल्याने मठाच्या ट्रस्टी श्रीमती शुभांगीताई बुवा याही भावुक झाल्या. मंडळाच्या इतर गायकांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक भक्तीमय भजनाने उपस्थितांचे कान तृप्त झाले. या अतुलनीय भजन सेवेने प्रभावित होऊन ‘श्री स्वामी समर्थ’ या टीव्ही मालिकेतील स्वामींची भूमिका करणारे अभिनेते अशोक कुलकर्णी हे देखील खूप आनंदित झाले आणि त्यांनी या भजनाची चित्रफीत मंडळाकडून खास मागून घेतली.

या भजन सेवेच्या पूर्वतयारीसाठी एच. बी. सावंत यांनी शुभराय मठाच्या महतीवर व्हिडिओ मागवून घेऊन स्वतः अभंग तयार केले. त्यानंतर शंकर महाराज, स्वामी समर्थ, दत्त, मारुती, आणि राम या देवतांच्या सर्व अभंग व गाण्यांची आठ दिवस माजगावात उजळणी करण्यात आली.

मंडळाचे विक्रम जाधव यांनी ही भजन सेवा यशस्वी करण्यासाठी शुभराय मठाच्या ट्रस्टी श्रीम. शुभांगीताई यांच्याशी संपर्क साधून तारीख व वेळ निश्चित केली.

या भजन सेवेत हनुमंत सावंत, विक्रम जाधव, ॲड. चंद्रशेखर गावडे, अथर्व नाईक, विलास नाईक, ज्ञानेश्वर सावंत आणि गौतम सावंत यांनी गायन केले. त्यांना हनुमंत सावंत (हार्मोनियम), विवेकानंद सावंत, सोमेश्वर सावंत (तबला), संदिप गावडे (तलरक्षक), आणि ओंकार सावंत, रावजी सावंत, हरिष सावंत, संचित गावडे, अज्नेय गावडे (कोरस) यांनी उत्कृष्ट संगीतसाथ दिली. या कार्यक्रमाला मळगाव येथील स्वामी समर्थ महाराज मठाचे श्री. राऊळ आवर्जून उपस्थित होते.

गेल्या वर्षीही या मंडळाने पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज मंदिर, सोलापूरचा शुभराय मठ आणि नरसोबावाडीचे दत्त मंदिर अशा राज्यातील चार प्रसिद्ध मंदिरांमध्ये यशस्वीरीत्या भजन सेवा परिक्रमा पूर्ण केली आहे.