Devrukh : सोने व्यावसायिकाला 10 जणांनी घेरले; अपहरण केले आणि 14 लाखांना लुटले

देवरूख-साखरपा मार्गावरील रात्री साडेदहाच्या घटनेने संगमेश्वरसह रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ 
 धनंजय केतकर यांनी सांगितलेली आपबीती अंगावर काटा आणणारी आणि पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणारी 

निलेश जाधव / देवरूख : 

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख परिसरात सोने व्यावसायिकाचे अपहरण करून लुटण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. देवरूखातील प्रसिद्ध केतकर नावाच्या सोने व्यावसायिकाचे दोन कारमधून आलेल्या १० जणांनी अपहरण करून त्यांच्याकडील १४ लाख सोन्याचे दागिने व २० हजाराची रोख रक्कम असा ऐवज लुटला. ही घटना देवरूख-साखरपा मार्गावरील वांझोळे येथे घडली आहे. या घटनेने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवरुख पोलिस ठाण्यात याबाबत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख पोलीसांनी अज्ञातांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत.

 

याबाबत देवरूख पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय गोपाळ केतकर (वय-६३, रा. मार्लेश्वर तिठा, देवरुख) हे देवरूखातील प्रसिद्ध सोने व्यावसायिक बुधवारी रात्री आपल्या चारचाकी गाडीतून साखरपाहून देवरूखच्या दिशेने येत होते. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास वांझोळे येथे दोन गाड्यातील १० जणांनी उतरून त्यांची गाडी अडवली. दरोडेखोरांनी त्यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण केली. व दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून त्यांना गाडीत कोंबले आणि राजापूरच्या दिशेने गाडी नेली. राजापूर दरम्यानच्या वाटूळ येथे त्यांना सोडून त्या दोन गाड्यांतून लुटारूंनी पोबारा केला.

 

दरम्यान, देवरूखातील प्रसिद्ध केतकर सोने व्यावसायिक यांना लुटण्यात आल्याची माहिती मिळताच अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक रवी मुहामुनी, लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी सुरेश कदम यांनी गुरूवारी वांझोळे येथे घटनास्थळी भेट दिली व धनंजय केतकर यांच्याकडून उद्भवलेल्या प्रसंगाची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी केतकर यांनी घटनाक्रम पोलीसांना सांगितला. यावेळी देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तर अज्ञात दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलीसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली असून या दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 311, 309(4), 310(1), 140(2), 127(2), 115(2), 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास देवरुख पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.