मित्रांसोबत पोहण्याचा आनंद घेत असताना सार्थकला पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील धनावडेवाडी बंधाऱ्यात 16 वर्षीय मुलाचा बूडून मृत्यू झाला. ही घटना रविवार 2 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गयाळवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सार्थक सुहास गुरव (16,मुळ रा.लांजा सध्या रा.शिवदर्शन अपार्टमेंट गयाळवाडी,रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. रविवारी सकाळी गयाळवाडी परिसरातील 4 ते 5 मित्रांसोबत पोहण्यासाठी कारवांचीवाडी येथील धनावडेवाडी बंधाऱ्यात गेला होता. मित्रांसोबत पोहण्याचा आनंद घेत असताना सार्थकला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाउन बुडू लागला. ही बाब त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरडा केल्यामुळे आजुबाजुच्या नागरिकांनी बंधाऱ्याजवळ धाव घेतली. त्यांनी सार्थला पाण्यातून बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. परंतू सार्थकच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.













